सातारा: गडकिल्ल्यांच्या गावाने जागविला शिवरायांचा इतिहास, अंबवडे बुद्रुकमध्ये तरुणांनी साकारले उभेहूब किल्ले
By जगदीश कोष्टी | Published: October 29, 2022 02:38 PM2022-10-29T14:38:01+5:302022-10-29T14:39:56+5:30
भव्य दिव्य किल्ले स्पर्धेत चाळीसहून अधिक किल्ल्यांचा सहभाग
जगदीश कोष्टी
सातारा : सातारा जिल्ह्यातील सज्जनगडच्या पायथ्याला असलेल्या परळी खोऱ्यातील अंबवडे बुद्रुक या गावांमध्ये दिवाळी निमित्ताने भव्य दिव्य किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये चाळीसहून अधिक किल्ल्यांनी सहभाग घेतला आहे. काही किल्ले मंडळांनी तर बहुतांश किल्ले हे घरगुती स्वरूपात साकारले आहेत. यातील सिंहगड हा किल्ला तब्बल अडीच गुंठे जागेत चाळीस फूट लांबी रुंदी आणि चार ते पाच फूट उंचीचा बनवला आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला शूर, वीर, पराक्रमाचा वारसा लाभला आहे. या जिल्ह्यात दिवाळीनिमित्ताने घरोघरी किल्ले बनविला जातात. अंबवडे बुद्रुक या गावाने किल्ले बनवण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही जपली आहे. यामध्ये प्रामुख्याने किल्ले प्रतापगड, सिंहगड, राजगड, लोहगड, मल्हारगड, जंजिरा यासारखे गड किल्ले तरुणांनी साकारले आहेत. हे बनवताना शेतातील लाकूड, भुस्सा, दगड गोटे यांचा वापर केला आहे.
मुलं सांगताहेत इतिहास
हे किल्ले पाहण्यासाठी खुले झाले असून साताऱ्यासह परिसरातील अनेक गावांमधून शेकडो इतिहास प्रेमी गावाला भेट देत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या इतिहासप्रेमींना लहान लहान मुले किल्ल्याचा इतिहास त्यातील बारकावे सांगत आहेत.
आम्ही दुर्गप्रेमी मंडळाने गेला दहा दिवसांपासून किल्ला बनवत आहे. यासाठी वाय आकारातील मेडी, पत्रा, भुसा वापरला आहे. तो चाळीस फूट लांबीचा रुंदीचा आहे. - साहिल जाधव