सावधान... खटाव तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:45+5:302021-02-19T04:29:45+5:30
पुसेगाव : काहीकाळ सुप्तावस्थेत गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. माण-खटाव तालुक्यांत मोठ्या बाजारपेठांची गावे नागरिकांच्या वाढत्या रहदारीने ...
पुसेगाव : काहीकाळ सुप्तावस्थेत गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. माण-खटाव तालुक्यांत मोठ्या बाजारपेठांची गावे नागरिकांच्या वाढत्या रहदारीने धोक्यात आली आहेत. परिसरासह इतर तालुक्यातील नागरिकही आता पुसेगावात खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कोरोना रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी जनतेने केली आहे.
गेल्या अकरा महिन्यांत खटाव तालुक्यातील विविध गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडत गेले. रुग्णांची संख्या जशी झपाट्याने वाढत होती तसा नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस, आरोग्य व स्थानिक प्रशासन कोरोना रोखण्यासाठी जीवाची बाजी लावत होते. वारंवार सूचना करूनही लॉकडाऊनच्या काळात नागरिक योग्य ती काळजी घेताना दिसले नव्हते. सध्या तर पोलीस प्रशासनाने अंगच काढून घेतले असल्याने पुसेगावात ‘आवो जावो घर तुम्हारा,’ अशीच परिस्थिती गावातील मुख्य चौकात, बाजारपेठेत, किराणासह इतर दुकानात दिसून येत आहे.
लग्नकार्य, वाढदिवसासाठी तोबा गर्दीत सुरू आहे. पाचवीपासून पदवीचे वर्ग सुरू झाले. धार्मिक विधी व मंदिरे दर्शनासाठी खुली झाली. गावोगावचे आठवडा बाजार चालू झाले. कोरोना आपल्यातून गायब झाला अशाच आविर्भावात नागरिक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. ना सोशल डिस्टन्सिंग, ना सॅनिटायझर, ना तोंडाला मास्क. मुंबई-पुणे व अन्य भागातून आलेल्या नागरिकांनी सतत खरेदीच्या निमित्ताने गर्दी केल्यानेच खटाव तालुक्यात कोरोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली आहे.
गेल्या दहा-अकरा महिन्यांत मागील कार्यकाळ असलेल्या पुसेगाव ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी कोरोनाबाबत काळजी घेतली. येथील नागरिकांना त्यावेळी केलेली गावातील दुकानांची बंदी अंगवळणी पडली होती. त्यानुसार नागरिक वागत होते. कोरोनाची भीती कमी वाटत होती. मात्र, भागातील मोठी गावे अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः बंद होती. त्यामुळे इतर भागातील नागरिक मोठ्या संख्येने पुसेगावात गर्दी करत होते.
चौकट..
कडक कायदा राबविण्याची गरज...
खटाव तालुक्यात प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता कडक कायदा राबविण्याची गरज दिसत आहे. पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे. ग्रामपंचायतीने गावातील बाजारपेठ काही दिवस बंद, काही दिवस चालू, असे करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, त्याला त्वरित आळा घालता यावा यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.
(चौकट)
खटाव तालुक्यात आतापर्यंत ४,२५४ कोरोना बाधितांची संख्या झाली होती. त्यातील १५६ रुग्ण दगावले आहेत. ३,९८६ रुग्णांची कोरोनातून सुटका झाली. खटाव तालुक्यातील विविध गावात सध्या ११४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. जानेवारी महिन्यात ११० कोरोना रुग्ण होते तर फेब्रुवारीच्या १८ तारखेला १९६ रुग्ण कोरोना बाधित आहेत. म्हणजे कोरोना वाढीचा आलेख चढता होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.