सावधान... जावळीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:17+5:302021-04-21T04:39:17+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याबरोबरच ...
कुडाळ : जावळी तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याबरोबरच आता तालुक्यातील बाजारपेठेची गावे आणि इतर भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.
गेल्या आठवडाभरात तालुक्यात कोरोना बाधितांमध्ये अधिकच वाढ झालेली आहे. याकरिता पंचायत समिती, आरोग्य विभाग, महसूल व गृह विभागांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच गोवोगाव लोकांच्यात जनजागृतीही केली जात आहे. नागरिकांनीही विनाकारण फिरणे टाळावे, सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. घरी राहा सुरक्षित राहा हा कानमंत्र जपत आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी आता वर्ष होत आले तरी सुरूच आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा नव्याने कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून यातच गेल्या आठ-दहा दिवसांत कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. आपल्या जवळच्यांचाच यात बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने मात्र आपल्याच माणसांचा मृत्यू मन हेलावून टाकत आहे.
जावळी तालुक्यातील वाढणारी रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी तालुक्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी कोरोना लक्षणे जाणवल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करून त्वरित उपचार घेतले पाहिजेत. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये सध्या कोरोना लसीकरण रावबले जात आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना संपला असे न वागता मास्कचा वापर करावा. यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे. याचबरोबर आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
(चौकट)
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईही...
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात कुडाळ, मेढा या ठिकाणी जनता कर्फ्यू आहे. तालुक्यात वाढणारी रुग्णांची संख्या धोक्याची घंटा आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईही होत आहे. प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. जनतेने नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.