सावधान... रुग्णालये फुल्ल; बेड मिळेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:54+5:302021-04-15T04:37:54+5:30
कऱ्हाड : ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असं म्हटलं जातं. सध्याही अशीच स्थिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यातच कऱ्हाडला ...
कऱ्हाड : ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असं म्हटलं जातं. सध्याही अशीच स्थिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यातच कऱ्हाडला रुग्णालयातील बेड ‘फुल्ल’ झाले असून, बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, तर ज्यांना गरज आहे, त्यांनाही बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे घरीच सुरक्षित राहणे गरजेचे बनले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका दिवसभर हॉस्पिटलच्या दरवाजात उभ्या राहायच्या. त्यावेळी दरवाजातच काही रुग्णांनी अखेरचा श्वास घेतल्याच्या घटनाही घडल्या. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. दिवसाला जिल्ह्यात हजारवर बाधित आढळून येत आहेत. या परिस्थितीत रुग्णांना अॅडमिट करण्यासाठी रुग्णालय शोधण्यापासून ते बेड मिळविण्यापर्यंत नातेवाइकांना कसरतच करावी लागत आहे. गतवर्षी अनेक संस्था, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना केअर सेंटर सुरू केली होती. त्याद्वारे रुग्णांना दिलासा मिळत होता. मात्र, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर ही सेंटर बंद झाली. त्यापैकी बहुतांश सेंटर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा सुरू केली गेलेली नाहीत. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सेंटर सध्या कार्यरत आहेत. त्याठिकाणचे बेडही रुग्णांनी फुल्ल आहेत.
शासनाने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयातही सध्या बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ‘होम आयसोलेट’ करण्यावर आरोग्य विभागाचा भर आहे, तर तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच रुग्णालयात पाठविले जात आहे. मात्र, तरीही सध्या बेडची उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांची ससेहोलपट सुरू असल्याचे दिसते.
- चौकट
रुग्णालयनिहाय बेडची संख्या
शारदा क्लिनिक : ४३
कृष्णा हॉस्पिटल : ४८०
सह्याद्री हॉस्पिटल : ८०
उपजिल्हा रुग्णालय : ५३
कऱ्हाड हॉस्पिटल : ४५
राजश्री हॉस्पिटल : २३
श्री आयसीयू : २८
बालाजी केअर : ३०
- चौकट
८१ व्हेंटिलेटर बेड
कऱ्हाडात व्हेंटिलेटरची मुळातच कमतरता आहे. शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून केवळ ८१ व्हेंटिलेटर असून, त्यामध्ये शारदा क्लिनिकमध्ये ७, कृष्णा ५२, सह्याद्री ७, उपजिल्हा रुग्णालय ५, कऱ्हाड हॉस्पिटल ४, श्री ३ आणि बालाजी कोरोना केअर सेंटरमध्ये ३ व्हेंटिलेटर बेड आहेत.
- चौकट
श्वास पुरविणार कोण..?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासली. त्यावेळी काही स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामपंचायतींनीही ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून ते रुग्णांना पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सध्या ही चळवळ पूर्णपणे थंडावली असून, गरज पडल्यास रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे.
- चौकट
बेडचा लेखाजोखा
ऑक्सिजन : ३२१
आयसीयू : ११६
इतर : ३४५
एकूण : ७८२
- चौकट
कोरोना अपडेट
एकूण बाधित : ११,७१४
कोरोनामुक्त : १०,३२४
दुर्दैवी मृत्यू : ३५९
उपचारात : १०३१
फोटो : १४केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक