मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी
By admin | Published: July 8, 2015 11:28 PM2015-07-08T23:28:19+5:302015-07-08T23:28:19+5:30
पृथ्वीराज चव्हाण : मलकापूर येथील कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांवर टीका
मलकापूर : ‘राज्याचे राजकारण सध्या कोणत्या दिशेला जात आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. बहुमताची सत्ता मिळालेल्या भाजप सरकारमधील भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे सरकार दिशाहीन बनत असल्याचे चित्र असून, राज्यकर्त्यांकडून मूलभूत विचारालाच तडा जात आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी,’ अशी मुख्य मागणी विधिमंडळात करणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मलकापूर, ता. कऱ्हाड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, राजेंद्र मुळक, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, ‘कितीही स्थित्यंतरे झाली तरी योग्य विचाराला साथ देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा इतिहास आहे. राजकारणात बदल हे तर होतच असतात; मात्र योग्य विचाराला जनता योग्यवेळी नेहमीच साथ देते. मात्र विद्यमान सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, हे विशेष.
हवामान बदलामुळे सध्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मराठवाडा तर पूर्णपणे कोरडाच आहे. पावसावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. पर्याय म्हणून त्यासाठी नवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. आघाडी शासनात आम्ही दहा लाख जनावरांना चारा छावणीच्या माध्यमातून चारा पुरवला होता. तर पाच हजार पाचशे टँकरने दुष्काळी भागात पाणी पुरवठा केला होता. अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला होता. पण सध्याचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने एकही सकारात्मक निर्णय घेण्याचे औदार्यही दाखवित नाही, ही बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांचे व जनतेचे हे सर्व प्रश्न घेऊन येणाऱ्या अधिवेशनात शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ (प्रतिनिधी)
विधिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र
आघाडी शासनाच्या काळात आम्ही प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो. नेमके आज ते चित्र उलटे झाले आहे. जनतेची दिशाभूल करून निवडून आलेल्या सरकारने आजपर्यंत कोणतीही मदत दिलेली नाही. हे सरकार पूर्णपणे दिशाहीन आहे. या दिशाहीन सरकारच्या विरोधात आगामी काळात विधिमंडळात काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केले.