वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:25 AM2022-07-10T10:25:55+5:302022-07-10T10:26:33+5:30
देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत.
महाबळेश्वर (जि. सातारा): देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत. या कारवाईत वाधवान हाऊस या बंगल्यातील सुमारे ४० कोटींपेक्षा अधिक किमतीची वाॅल पेंटिंग सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाबळेश्वर शहरापासून दोन किमी अंतरावर गणेशनगर हौसिंग सोसायटीजवळ वाधवान बंधू यांचा अलिशान बंगला आहे. या बंगल्यावर शुक्रवारी सकाळी सीबीआयचे पथक दाखल झाले.
दोन महिला अधिकाऱ्यांसह एकूण १२ अधिकारी आणि येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असे एकूण वीस लोकांचा या कारवाईत समावेश आहे. या बंगल्यात करोडो रुपयांची देश विदेशातील पेंटिंग झुंबर व अतिशय दुर्मीळ, परंतु मौल्यवान शोभेच्या वस्तूदेखील आहेत. या सर्व वस्तूंना गेली दोन दिवस सील करण्याचे काम सुरू आहे. काही वस्तू भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही वस्तू हाताने काढता येत नसल्याने स्थानिक सुतार कामगारांना बोलविण्यात आले होते.
एक सहा बाय पाच फूट मोनालिसाचे भव्य महागडे भीत्तिचित्र होते, ते काढण्यासाठी मला बोलावले होते, अशी माहिती बाहेर आल्यानंतर त्या कामगाराने दिली. या कारवाईचा थांगपत्ता स्थानिक पोलिसांना नव्हता.