स्टंटबाजांवर ‘सीसीटीव्ही’चा उतारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:20+5:302021-02-16T04:40:20+5:30
सातारा : वाहनधारकांच्या सुरक्षिततेसह स्टंटबाजांवर अंकुश लावण्यासाठी सातारा पालिकेकडून ठोस पावले उचलण्यात आली आहे. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमध्ये ...
सातारा : वाहनधारकांच्या सुरक्षिततेसह स्टंटबाजांवर अंकुश लावण्यासाठी सातारा पालिकेकडून ठोस पावले उचलण्यात आली आहे. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमध्ये (भुयारी मार्ग) पालिकेकडून एकूण ८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, आता प्रत्येक हालचालींवर पालिकेकडून कटाक्ष ठेवला जात आहे.
आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातारा पालिकेने ७५ कोटी रुपये खर्च करून ग्रेड सेपरेटरची उभारणी केली. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागल्याने वाहनधारकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, बांधकाम विभागाकडून ग्रेड सेपरेटरचे नुकतेच सातारा पालिकेकडे हस्तांतरण झाले आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आता पालिकेवर आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने वाहनधारकांच्या सुरक्षेला महत्त्व देत ग्रेड सेपरेटेरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली असून, चारही प्रवेशद्वारांवर आठ कॅमेरे लावण्यात आले आहे. विकास निधीतून यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ही यंत्रणा पोवई नाक्यावरील रजताद्री हॉटेलमधून चालविली जात आहे. पुढील टप्प्यात याचे मॉनिटरिंग पोलिसांच्या वाहतूक शाखेतून करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
(चौकट)
सुरक्षा रक्षकाची नेमणूक गरजेची
ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करताना वाहनांच्या वेगावर मर्यादा असणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश वाहनचालकांना याचा विसर पडल्याचे दिसते. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासाने याठिकाणी सुरक्षा रक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
(पॉइंटर्स)
- ग्रेड सेपरेटरमध्ये रात्रीच्या वेळी स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढू लागली आहे.
- अशा दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवणे आता अधिक सोपे होणार आहे.
- अनेक दुचाकीचालक रात्रीच्या वेळी धोका पत्करून विरुद्ध दिशेने प्रवास करतात. अशा दुचाकीस्वारांवरदेखील कारवाई केली जाणार आहे.
- निर्बंध असतानाही अनेक शालेय व महाविद्यालयीन तरुण तसेच ग्रेड सेपरेटरमधून पायी चालत जातात.
- अशांवर देखील पालिकेचा कटाक्ष असणार आहे
(कोट)
ग्रेड सेपरेटरच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता पालिकेच्या खांद्यावर आहे. प्रशासनाने वाहनधारकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सध्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पुढील टप्प्यात भुयारी मार्गात कॅमेरे लावण्याचे प्रशासनाने नियोजन आहे.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
फोटो : १५ सीसीटीव्ही ०१/०२/०३
वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा पालिकेने ग्रेड सेपरेटरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. (छाया : जावेद खान)
लोगो : लोकमत फॉलोअप