पथदिव्याच्या खांबांवर ‘सीसीटीव्ही’चा भार !

By admin | Published: September 4, 2015 08:22 PM2015-09-04T20:22:45+5:302015-09-04T20:22:45+5:30

गणेशोत्सवात उघडतात डोळे : वारंवार खर्च; पण वॉच कायमस्वरूपी नाहीच; अकरा महिने कॅमेऱ्यांवर फक्त धुरळा--कऱ्हाड फोकस

CCTV loads on the pillars of the path! | पथदिव्याच्या खांबांवर ‘सीसीटीव्ही’चा भार !

पथदिव्याच्या खांबांवर ‘सीसीटीव्ही’चा भार !

Next

संजय पाटील- कऱ्हाड  --शहरातील बाजारपेठेसह मुख्य चौकांमध्ये असलेल्या पथदिव्याच्या खांबांवर सुमारे चार वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले; पण दरवर्षी फक्त गणेशोत्सवालाच या खांबांना डोळे फुटतायत. एरव्ही या ‘सीसीटीव्ही’वर धुरळा साचला किंवा वायर रस्त्यावर लोंबकळल्या तरी त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. कऱ्हाड हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा ज्याप्रमाणात विस्तार होतोय त्याच प्रमाणात येथे गुन्हेगारी कारवायाही वाढतायत. या गुन्हेगारी कारवाया व शहरातील मुख्य बाजारपेठेतील हालचालींवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पोलिसांकडून पालिकेकडे करण्यात आली. त्याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहाराला पालिकेकडूनही त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पाठपुराव्यानंतर शहरातील दत्त चौकापासून बसस्थानकाकडे जाणारा मार्ग व दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक ते कन्या शाळा मार्गापर्यंतच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुख्य चौक व जागा निश्चित करण्यात आल्या. पालिकेच्या सभेत त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. अखेर कंत्राटदाराच्या माध्यमातून ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्या. बहुतांश ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे पथदिव्यांच्या खांबांवर बसविण्यात आले आहेत. दत्त चौकापासून कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बसस्थानकापर्यंत असलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर आजही कॅमेरे लटकताना दिसतात.
शहरात २०११ मध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे पहिल्यांदा कार्यान्वित करण्यात आले. मुख्य बाजारपेठ व कन्या शाळेमार्गे चावडी चौक हा मिरवणुकीचा मार्ग असल्याने प्राधान्याने या मार्गांवर ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यानंतर कायमस्वरूपी हे कॅमेरे सुरू राहतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सव संपताच सीसीटीव्हीकडेही पोलीस व पालिकेचे दुर्लक्ष झाले. एक-एक करीत सर्वच ठिकाणचे कॅमेरे बंद पडले. त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा एकदा कायमस्वरूपी सीसीटीव्ही सुरू ठेवण्यासंदर्भात कार्यवाही झाली. मात्र, तीही फोल ठरली. दरवर्षी फक्त गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रशासनाला सीसीटीव्हीची आठवण होते. एरव्ही संबंधित कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्याची परिस्थिती आहे. मुळातच ‘सीसीटीव्ही’ची देखभाल दुरुस्ती करायची कुणी, हा प्रश्न आहे. यापूर्वी लावण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’ची जबाबदारी पालिकेच्या म्हणण्यानुसार पोलिसांवर होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, सीसीटीव्ही असूनही देखभाल, दुरुस्ती न झाल्याने त्याचा काहीच उपायोग होत नव्हता. अशातच काही दिवसांपूर्वी पालिकेच्या बैठकीत पूर्वीच्या ‘सीसीटीव्ही’बरोबरच आणखीही काही ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. यापूर्वीच्या व नवीन ‘सीसीटीव्ही’ची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी पालिकेने घेतली आहे.


दोन वर्षांपूर्वी अडीच लाखांचा निधी...
कऱ्हाड शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात याव्यात, याबाबत १३ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी शहर पोलीस ठाण्यामार्फत पालिकेला एक पत्र पाठविले.
शहरात २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी त्यावेळी पोलिसांची मागणी होती. पालिकेने यासंदर्भात चर्चा करून सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेत कार्यवाही सुरू केली.
पालिकेने दत्तचौक, यशवंत हायस्कूल, आझाद चौक, कच्छी चौक, नेहरू चौक, चावडी चौक, गुरुवार पेठेतील दर्गा मोहला, कमानी मारुती चौक या सात ठिकाणी कॅमेरे बसविले.
सीसीटीव्ही बंद पडल्यामुळे पुन्हा ७ सप्टेंबर २०१३ रोजी पत्र व्यवहार झाला. सीसीटीव्ही कायमस्वरूपी कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली.
१४ सप्टेंबर २०१३ रोजी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील सीसीटीव्ही संदर्भात ठराव मांडण्यात आला. त्या ठरावाला मंजुरीही मिळाली.
पालिकेच्या ठरावानुसार २ लाख ५३ हजारांचा निधीही सीसीटीव्हीसाठी मंजूर करण्यात आला. त्यामधून प्रत्यक्ष २ लाख ४९ हजार एवढा खर्च केला गेला.


कॅमेरे बंद स्थितीत
कऱ्हाड शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या दत्त चौकात सीसीटीव्ही असून, ते बंद आहेत.
दत्त चौकापासून कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या सीसीटीव्ही सध्या बंद आहेत.
मुख्य बाजारपेठेसह कन्या शाळा मार्गावर मिळून एकूण ९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी पालिकेच्या बैठकीत शहरातील सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालिका बैठकीत झालेल्या चर्चेनुसार प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली असून, सीसीटीव्ही गणेशोत्सवाबरोबरच कार्यमस्वरूपी सुरू राहणे गरजेचे आहे.

फुटेज दर्जाहीन
सीसीटीव्ही चांगल्या दर्जाच्या नसल्याने त्याचे फुटेज पाहिले असता, ते ओळखूही येत नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कॅमेऱ्याची गरज आहे.

तपासासाठी उपयोग नाहीच
मारामारीसह चोरीच्या व इतर गंभीर गुन्ह्यात पोलिसांना शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होणार आहे; पण आजपर्यंत एकही गुन्ह्यात सीसीटीव्ही पोलिसांना उपयोग झाल्याचे ऐकिवात नाही.

Web Title: CCTV loads on the pillars of the path!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.