पुसेगावात ‘एक गाव एक दुर्गा’उत्सव साजरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:15+5:302021-09-27T04:42:15+5:30
पुसेगाव : ‘कोरोनाचे संकट असताना गणेशोत्सवात पुसेगाव पोलीस ठाण्याच्या प्रत्येक गावातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे या पोलीस ...
पुसेगाव : ‘कोरोनाचे संकट असताना गणेशोत्सवात पुसेगाव पोलीस ठाण्याच्या प्रत्येक गावातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांनी ‘एक गाव एक दुर्गा’ उत्सव साजरा करावा,’ असे आवाहन पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी केले आहे.
येथील सलोखा सभागृहात आयोजित केलेल्या दुर्गादेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच विजय मसणे, गणेश जाधव, संतोष तारळकर, विकास जाधव, सूरज जाधव,पी.डी. जाधव, राजू गाडे, रणधीर जाधव, मधू टिळेकर, रवी जाधव, गणेश गुरव, विकास सोनवणे, योगेश मदने यासह विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. येत्या काही दिवसात मंदिरे खुली होणार असली तरीही दुर्गोत्सव साजरा करण्याबाबत अद्याप शासनाची नियमावली प्राप्त झाली नाही. त्यामुळे शासनाचे नियम पाळून शांततेत व पारंपरिक पद्धतीने यंदाचा दुर्गादेवीचा उत्सव साजरा करावा. शक्यतो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या एन्जॉयमेंटला आवर घालून ‘एक गाव एक दुर्गा’हा उपक्रम राबविला तर शासन व प्रशासनाला तरुण पिढीचे कोरोना रोखण्यासाठी मोठे सहकार्य होणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले. डीजे, रोशणाई, देखावे, भव्यदिव्य मंडप या सर्वाला मंडळांनी फाटा द्यावा व गावात एकाच दुर्गादेवीची प्राणप्रतिष्ठापना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुसेगावात १७ दुर्गादेवी मंडळे आहेत. काही मंडळांच्या देवीच्या मोठ्या मूर्ती कायमच्याच आहेत. त्यासाठी सुरक्षित स्वतंत्र शेड ही आहे. त्याच शेडमध्ये शेजारी विसर्जित करावयाच्या देवीची एखादी छोटीशी मूर्ती बसून घटस्थापना करण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी जेणे करून प्रत्येक मंडळांच्या असलेल्या कायमच्या मूर्तीची ही पूजाअर्चा गर्दी न करता होईल, असे मत संतोष तारळकर, विकास जाधव, सूरज जाधव यांनी व्यक्त केले.
(कोट)
दुर्गादेवी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करूयात, या धार्मिक कार्यक्रमात कुणावरही गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाचे नियम डावलून जर कार्यकर्यांनी, मंडळांनी डीजे वाजवली तर प्रशासनालाही वाजवण्याची वेळ आणू नका.
-संदीप शितोळे, सहायक पोलीस निरीक्षक, पुसेगाव
२६पुसेसावळी
पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या दुर्गादेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी संवाद साधला.