प्रतापगडावर शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 03:15 PM2020-12-21T15:15:40+5:302020-12-21T15:17:37+5:30
Pratapgad Fort- कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सातारा : कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आज सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. व्यवस्थापक ओंमकार देशपांडे यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.
भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता चौगुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह सर्व उपस्थितांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.
पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ''क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे पूजन करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवप्रतापदिन साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.