किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:34 PM2022-02-19T13:34:34+5:302022-02-19T13:36:37+5:30
किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली
सातारा : किल्ले प्रतापगड, ता. महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला.
किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची शनिवारी सकाळी मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावाने पूजन करून भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.