तीन वर्षांपासून सलग होतोय रक्तदानाने वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:02 AM2021-01-08T06:02:43+5:302021-01-08T06:02:43+5:30
परळी : मुलीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि हजारो रुपयांची उधळपट्टी करत साजरा करणारे अनेकजण पाहायला मिळतात; पण रक्ताची गरज ...
परळी : मुलीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि हजारो रुपयांची उधळपट्टी करत साजरा करणारे अनेकजण पाहायला मिळतात; पण रक्ताची गरज लागल्यानंतर झालेली कुटुंबाची अवस्था आणि आघातातून सावलेल्या एका तरुणाने आपल्या मुलीच्या वाढदिवसादिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा अनोखा पायंडा पाडला आहे. गेल्या तीन वर्षांपासून परळी भागातील सोनवडी याठिकाणी हा उपक्रम सुरू आहे.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय; परंतु त्याचे स्वरूप बघता वाढदिवस हा अनावश्यक खर्च आणि धांगडधिंगा याचे एकत्रित समीकरण झाले आहे. तीन-चार वर्षांपूर्वी विकास कारंडे ( रा. सोनवडी) हा तरुण अत्यंत गरजू रुग्णास निगेटिव्ह रक्तगट उपलब्ध होत नव्हते. घरातील सर्वांची उडालेली पळापळ, घरातील कर्त्या पुरुषास योग्यवेळी रक्त मिळेल की नाही, या काळजीने त्रस्त झालेले कुटुंबातील सदस्य, एक रक्त पिशवी ऐनवेळी उपलब्ध नसल्यास त्या कुटुंबावर उभे राहिलेले संकट तसेच त्या व्यक्तीवर ओढावलेला जीवन मरणाचा प्रश्न यातून आपण काय करू शकतो, याचा विचार करत असताना मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिर भरवून ही रक्ताची तीव्रता काही प्रमाणात कमी करता येईल का? असा विचार आला आणि पत्नी दीपाली हिच्या सकारात्मक विचाराने मुलीच्या वाढदिवसाला सुरू झालेला हा रक्तदान शिबिराचा प्रवास सलग तीन वर्षे यशस्वीपणे पार पडला.
कोणताही अतिरिक्त अनावश्यक खर्च न करता साधेपणाने सर्व मित्र नातलग यांच्या शुभेच्छा स्वीकारून हा वाढदिवस साजरा केला जातो. मुलीच्या वाढदिवसाला या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांमुळेच हा संकल्प सिद्दीस जातो, त्यामुळे याचे सर्व श्रेय उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना जाते.
सलग तीन वर्षे सुरू असलेल्या उपक्रमाचा सर्वच स्तरावरून कौतुक वर्षाव होत आहे. तसेच पहिल्या वर्षी ५० पेक्षा जास्त तर दुसऱ्या वर्षी ३५ तर यावर्षी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.