बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 11:55 PM2019-01-09T23:55:45+5:302019-01-10T00:02:30+5:30

वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी

Celebration in Bavalwadi: Three hundred elderly cut cakes at the same time | बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक

बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक

Next
ठळक मुद्देतरुणांच्या अनोख्या उपक्रमाने अनेकजण गहिवरलेखंडाळा तालुक्यातील बावकलवाडी हे तसं कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव.

लोणंद : वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी येथील तरुणांना एक कल्पना सुचली अन् त्यांनी ती प्रत्यक्षात पूर्णही केली. आधारकार्डवर एकच जन्मतारीख असलेल्या गावातील तब्बल तीनशे वयोवृद्धांना त्यांनी एकत्र केलं अन् मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

खंडाळा तालुक्यातील बावकलवाडी हे तसं कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव. शेती हेच येथील ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन. आताची पिढी शिक्षण अन् नोकरीसाठी घराबाहेर पडली आहे. तर दुसरीकडे गावातील वयोवृद्ध व्यक्तींच्या रुपाने आठवणींचा झरा आजही अखंडपणे वाहत आहे. गावाची लोकसंख्या हजारांच्या घरात असून, यामध्ये सुमारे तीनशे ते चारशे वृद्ध पुरूष व महिलांचा समावेश आहे.

काही वृद्धांच्या आधारकार्डवर १ जानेवारी अशी जन्मतारीख नोंदविण्यात आल्याची माहिती गावातील तरुणांना मिळाली. तरुणांनी पाहणी केली असता एकच जन्मतारीख असलेल्या तीनशे महिला व पुरुषांची नावे समोर आली. या वृद्धांसाठी आपण काहीतरी करावं, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानुसार सर्व वृद्धांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे तरुणांनी लोकवर्गणी गोळा केली. वृद्ध महिला व पुरुषांच्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यात आले. गावात भव्य स्टेज उभारण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. वाढदिवसाची तयारी पूर्ण झाल्यानंतर तीनशे वृद्ध महिला व पुरुषांनी केक कापून आपला पहिला-वहिला वाढदिवस साजरा केला. या अनोख्या उपक्रमाने वयोवृद्धांचा आनंद द्विगुणित झाला होता. प्रत्येकाने एकमेकांना व आपल्या कुटुंबीयांना केक खाऊ घालून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

देशभरात साजरा झालेला हा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.कष्टकरी लोकांना त्यांच्या वाढदिवसाचा आनंद उपभोगता यावा, हाच या उपक्रमागील उद्देश आहे. प्रत्येक गावात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात यावा. अशी माहिती गणेश केसकर यांनी दिली.

वृक्षांची लागवड
वाढदिवसानिमित्त गावात विद्यार्थ्यांकडून वृक्ष दिंडी काढण्यात आली. तसेच वेगवेगळ्या जातीच्या तब्बल २ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्धार विद्यार्थी व ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.

 

Web Title: Celebration in Bavalwadi: Three hundred elderly cut cakes at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.