कृष्णा कारखान्यावर सहकार पॅनेलच्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:44+5:302021-07-03T04:24:44+5:30

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलेल्या जयवंतराव ...

Celebration of unprecedented victory of co-operative panel on Krishna factory | कृष्णा कारखान्यावर सहकार पॅनेलच्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष

कृष्णा कारखान्यावर सहकार पॅनेलच्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष

Next

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलेल्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सर्व विजयी संचालकांचे शुक्रवारी कृष्णा कारखाना कार्यस्थळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. कऱ्हाडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव व खानापूर तालुक्यांतून आलेल्या शेकडो सभासदांनी सहकार पॅनेलचे नेते आणि विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे जंगी स्वागत केेले.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता. १) रात्री उशिरा जाहीर झाला. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने अभूतपूर्व यश संपादन करत, विरोधकांना चितपट केले. या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागांवर प्रचंड मतांनी विजय संपादन केला. या विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत कारखान्यावर करण्यात आले.

तत्पूर्वी डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले यांनी कऱ्हाड येथील प्रीतिसंगम घाटावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. याप्रसंगी कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुकुंद चरेगावकर आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले यांनी वाळवा तालुक्यातील नवनिर्वाचित संचालकांसमवेत इस्लामपूर येथे लोकनेते दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यांच्यासमवेत नवनिर्वाचित संचालक लिंबाजी पाटील, संजय पाटील, जे. डी. मोरे, संभाजीराव पाटील, अविनाश खरात, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुकाध्यक्ष संजय पाटील, आनंदराव पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, कारखान्याचे माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, नगरसेवक शहाजी पाटील, शंकरराव पाटील, संदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांचे कारखाना कार्यस्थळावर आगमन झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत डॉ. भोसले यांचे स्वागत केले. याठिकाणी सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भालचंद्र देशमुख, विश्वतेज देशमुख, ॲड. दिपक थोरात, संपतराव देशमुख सहकारी दुध संघाचे चेअरमन तानाजी जाधव उपस्थित होते. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही डॉ. भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कारखान्याच्या सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात कराड, वाळवा, कडेगाव व खानापूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांकडून डॉ. सुरेश भोसले यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, ‘कृष्णा कारखान्याच्या इतिहासात आत्तापर्यंत अशी निवडणूक झालेली नाही. सभासदांनी मोठ्या विश्वासाने सरासरी ११,००० मताधिक्य देऊन आमच्या सर्वच उमेदवारांना निवडून दिले आहे. सभासदांच्या या भरघोस पाठिंब्यामुळे आमच्या जबाबदारीत वाढ झालेली असून, येत्या काळात आमच्या कामाने सभासदांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू. किंबहुना कृष्णा कारखाना नंबर एकला नेण्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. सभासद व कार्यकर्त्यांनी मनापासून केलेल्या अविरत कष्टामुळे सहकार पॅनेलला हे यश प्राप्त झाले आहे. कारखानदारी पुढे नेण्यासाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. तसेच कुणावरही अन्याय होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जाईल.’

चौकट

राजकारणी मंडळींचे मनसुबे धुळीला!

या निवडणुकीत विरोधकांकडे आपल्या विरोधात एकही मुद्दा नव्हता. त्यांच्याकडे पुढील व्हिजनही नव्हते. मुख्य म्हणजे मनोमिलन करायला जी राजकीय मंडळी पुढे झाली होती, त्यांचे मनसुबे सभासदांनी धुळीला मिळवून या राजकारण्यांना दूर ठवले, असे प्रतिपादन डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी केले.

फोटो ओळी :

कऱ्हाड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी शुक्रवारी अभिवादन केले. यावेळी डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होते.

Web Title: Celebration of unprecedented victory of co-operative panel on Krishna factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.