नेत्यांच्या बांधाला सिमेंट बंधारे
By admin | Published: July 10, 2015 10:19 PM2015-07-10T22:19:56+5:302015-07-10T22:19:56+5:30
स्थानिकांतून संताप : माथा-पायथ्यास तिलांजली
सूर्यकांत निंबाळकर -आदर्की -पाणलोट क्षेत्रात काम करताना माथा किंवा पायथा असा निकष लावला जातो. परंतु, फलटण पश्चिम भागात निकषास तिलांजली देत प्रथम पुढाऱ्यांनी बांधावर सिमेंट बंधारे बांधल्याने संताप व्यक्त होत आहे.
फलटण पश्चिम भागात डोंगराळ भाग असल्याने पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम विविध योजनेतून राबवले जात आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना घशात घालण्याची सवय लागल्याने गाव पुढारी वर्गाची पाझर तलाव, नालाबांध योजना म्हटलं की, गरीब, भूमीहीन शेतकरी वर्गाच्या जमिनी दाखवून कामे केली. परंतु, शेततळी व सिमेंट बंधारे म्हटले की गाव पुढारी जागे होऊन अधिकारी वर्गांना बरोबर घेऊन आपल्या खासगी विहिरींना फायदा होणार अशा ठिकाणी सिमेंट बंधारा जागा फायनल केली गेली. त्यामुळे माथा किंवा पायथा असा निकष बाजूला ठेऊन बंधारे बांधले.
त्यामुळे साखळी बंधारे म्हणायलाच राहिले आहेत. प्रत्येक बंधारा बांधताना पाणीसाठ्यापेक्षा पुढारी वर्गाचे संबंध पाहूनच बंधारे बांधल्यामुळे शासनाचे पाणी अडवा पाणी जिरवा योजना पाण्यात गेल्याची चर्चा सुरु आहे.