शतकोत्तरातील आजीबाईंचे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:02+5:302021-01-16T04:43:02+5:30

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. लोकशाहीचा सोहळा साजरा करण्यात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. सातारा तालुक्यातील ...

Centenary Grandmothers Voting | शतकोत्तरातील आजीबाईंचे मतदान

शतकोत्तरातील आजीबाईंचे मतदान

Next

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. लोकशाहीचा सोहळा साजरा करण्यात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. सातारा तालुक्यातील आवाडवाडी (आंबेदरे) ग्रामपंचायतीसाठी पार्वती शंकर रायगडे यांनी व्हीलचेअरवरून येऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

०००००००००

हॉटेल उशिरापर्यंत

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल सुरू ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. तरीही, काहीजण रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवत आहेत. अशा हॉटेलवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तरीही, शटर बंद करून व्यवसाय केले जात आहेत.

०००

विद्युतपुरवठा खंडित

खटाव : खटाव महावितरण उपविभागाकडून वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

०००००००

बसस्थानकात पत्रपेटी

दहिवडी : राज्य परिवहन महामंडळाच्या दहिवडी बसस्थानकात पोस्ट खात्याने टपालपेटी ठेवली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांना या पत्रपेटीमुळे चांगला फायदा होत आहे. टपाल टाकण्यासाठी पोस्ट कार्यालयापर्यंत जाण्याची गरज भासत नसून बसस्थानकात एसटीतून उतरले की सोय होते.

०००००

कोरोनामुळे काळजी

दहिवडी : माण तालुक्यातील सीतामाईच्या डोंगरावर दरवर्षी सुवासिनी मकरसंक्रांतीला वाणवसा घेण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गुरुवारी या डोंगरावर कोणीही महिला आल्या नव्हत्या.

०००००

युवा दिन साजरा

सातारा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी युवावस्थेत होणारे गुन्हे, बालगुन्हेगारी अन् त्याचे भावी आयुष्यावर होणारे परिणाम या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्यात आले.

००००००

अध्यापक विद्यालयातही ऑनलाइन शिक्षण

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, अध्यापक विद्यालये अजूनही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ही विद्यालये कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे. सध्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान केले जात आहे.

००००००

गोंदवलेत शुकशुकाट

सातारा : माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील मंदिरात दरवर्षी मकरसंक्रांतीला भाविकांची गर्दी झालेली असते. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने उत्सव साजरे करण्यावर प्रशासनाने बंधने घातली आहेत. त्यामुळे गोंदवलेत यंदा शुकशुकाट जाणवत होता.

०००००००

मैदानांवर गवत

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी क्रीडांगणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. तेव्हापासून साताऱ्यातील मैदानांवर शुकशुकाट अनुभवास मिळत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत उगवले असल्याने प्राण्यांचा वावर वाढला आहे.

००००००

घाटात प्रशस्त रस्ता

खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील रस्ता रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनेही सुसाट धावत असून कंटेनर आला, तरी सहज वळण घेऊ शकतो. त्यामुळे घाटात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले असून प्रवासाला वेळही कमी लागत आहे.

०००००००

मेथीची आवक वाढली

सातारा : साताऱ्यातील बाजारात गेल्या महिन्यात मेथीच्या भाजीची आवक चांगलीच वाढली होती. त्यानंतर ती मंदावल्याने महाग झाली होती. आता पुन्हा आवक वाढली आहे. त्यामुळे मोठ्या पेंढ्या १० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे नागरिकांतून मागणीही वाढत आहे.

०००००००००

गांधी मैदानावर विक्री

सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानाचा दिवाळीत किरकोळ विक्रीसाठी वापर केला जात होता. त्यानंतर मैदान सुनेसुने झाले होते. मात्र, संक्रांतीसाठी आवश्यक असणारे सुगड विक्रेते गांधी मैदानावर पुन्हा बसले होते. त्यामुळे काही दिवसांनंतर गांधी मैदान फुलले होते.

०००००००

राजवाडा चौपाटी इतरत्र विखरून वसली

सातारा : साताऱ्यातील राजवाडा चौपाटी कोरोनापासून बंद आहे. संसर्ग कमी झाल्यामुळे हॉटेलसह इतर व्यवसायाला परवानगी मिळाली. त्यानंतर हातगाडी हळूहळू सुरू झाली. पण, राजवाडा चौपाटी बंद असल्याने राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावर सायंकाळी ६ वा.नंतर अनेक गाड्या लागलेल्या असतात. यामध्ये पाणीपुरी, वडापावच्या गाड्या लावल्या जात असून नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत आहे.

००००००

कॅमेरे धूळखात पडून

सातारा : मोबाइल क्रांती होण्यापूर्वी अनेकांनी रोलचे कॅमेरे घेतले होते. आता मोबाइलमध्ये चांगल्या दर्जाचे फोटो काढता येत असल्याने कॅमेऱ्याचे रोल कालबाह्य झाले असून जुने कॅमेरेही वापराविना धूळखात पडून आहेत. त्यामुळे हे कॅमेरे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

०००००

वसुंधरा अभियान

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांनी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबवले आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून पालिकाही अनेक उपक्रम राबवत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

००००००

ग्रेड सेपरेटरमध्ये प्लास्टिकचा कचरा

सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण होऊन काही दिवस झालेले असतानाच कचरा येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी रयत शिक्षण संस्थेसमोरून ग्रेड सेपरेटरच्या भुयारी रस्त्यात जाण्याच्या मार्गात प्लास्टिक पिशव्या पडल्या होत्या. हा कचरा तत्काळ हटविण्याची मागणी सातारकरांमधून केली जात असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Centenary Grandmothers Voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.