बसस्थानकातील झुणका भाकर केंद्र अखेर जमीनदोस्त
By Admin | Published: April 19, 2017 02:53 PM2017-04-19T14:53:33+5:302017-04-19T14:53:33+5:30
एसटी महामंडळाने घेतला जागेचा ताबा
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १९ : बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राच्या जागेचा ताबा घेण्यासाठी एसटी महामंडळाने मंगळवारी रात्री बारा वाजता अचानक बुलडोझर आणून हे केंद्र अखेर उद्ध्वस्त केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बसस्थानकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
गेल्या सहा महिन्यांपासून एसटी महामंडळ आणि दलित महिला विकास संघटनेमध्ये बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचा ताबा घेण्यावरून वाद सुरू होता. बसस्थानकातील झुणका भाकर केंद्र महिलांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. त्यानंतर या केंद्राविषयी बसस्थानक प्रशासन आणि महिलांमध्ये मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. याविषयी बसस्थानक प्रशासनाने न्यायालयात दाद मागितली होती.
सुमारे २ महिन्यांपूर्वी बसस्थानक प्रशासनाच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला होता. त्यावेळी हे केंद्र एसटी महामंडळाने सील केले होते. परंतु महिलांनी या केंद्राचा ताबा सोडला नव्हता. केंद्राबाहेर मांडव घालून महिलांचे आंदोलन सुरूच होते. दरम्यान मंगळवारी रात्री केंद्राबाहेर कोणी नसल्याचे पाहून एसटी महामंडळाने अचानक बुलडोझर आणून हे केंद्र जमीनदोस्त केले. (प्रतिनिधी)