कोरोनात केंद्राने मदत केली; राज्य सरकारने पाठ थोपटून घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:41+5:302021-03-07T04:35:41+5:30
म्हसवड : ‘कोरोनाविरोधात संघर्ष करताना वर्षभरात केंद्र सरकारने राज्य सरकारला लागेल ती मदत केली आहे. कोरोना काळात बहुतांशी योजना ...
म्हसवड : ‘कोरोनाविरोधात संघर्ष करताना वर्षभरात केंद्र सरकारने राज्य सरकारला लागेल ती मदत केली आहे. कोरोना काळात बहुतांशी योजना केंद्रानेच राबविल्या आहेत. राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. जम्बो हॉस्पिटल उभारण्यात काही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला आहे. सातारा जिल्ह्यातील जम्बो हॉस्पिटलच्या जादा खर्चाची चौकशी करावी,’ अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली.
मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ‘कोरोनाविरुद्ध लढाई लढताना राज्याने केंद्राच्याच बहुतांशी योजना राबविल्या आहेत. राज्याने स्वतःची पाठ थोपटून घेताना केंद्राने किती व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किट दिली, राज्याने किती घेतली, याची आकडेवारी जाहीर करावी. सध्या सुरू असलेले लसीकरणही केंद्राकडूनच सुरू आहे. राज्यातील जनतेला मिळत असलेले स्वस्त धान्यही केंद्रामुळेच मिळत आहे. धान, कापूस खरेदीतही केंद्राचीच मदत होत आहे. जीएसटीचा परतावाही दरवर्षी राज्याला मिळत आहे. केंद्राने काहीच केले नाही, असे सांगताना राज्याने काय केले हे ही जनतेला सांगण्याची गरज आहे. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राने केलेल्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे, मात्र त्याचवेळी काही ठराविक अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करुन भ्रष्टाचार केला आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे.’
‘जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना जिल्हा रुग्णालय, इतर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार केले जात होते. अखेरीस जिल्ह्यात जम्बो कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यातील अतिदक्षता, व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन प्लांटसाठी किती खर्च झाला. रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची जादा दराने का खरेदी केली, याची चौकशी झाली पाहिजे. जम्बो रुग्णालयाला जिल्हा नियोजन मंडळाकडूनही भरीव निधी देण्यात आला होता. स्वयंसेवी संस्थांनी मोठी मदत केली होती. या रुग्णालयाच्या उभारणीचा हिशोब समोर यायला हवा,’ असे मतही आमदार गोरे यांनी व्यक्त केले.
चौकट .....
वीजजोड तोडायचे सोडा, नवीन द्या
कोरोना काळात आलेली भरमसाठ वीजबिले माफ करु, नंतर कमी करु, अशी आश्वासने राज्य सरकारने दिली. मात्र, सध्या वीजबिल न भरणाऱ्यांची जोडणी तोडली जात आहे. यावर्षी पीकपाणी चांगले आहे. शेतकऱ्यांना आता विजेची गरज आहे. त्यामुळे वीज जोडणी तोडायची थांबवून मागेल त्या शेतकऱ्याला नवीन वीज जोडणी द्यावी, अशी मागणीही आमदार गोरे यांनी केली.