आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी केंद्र निधी पुरवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:03+5:302021-07-19T04:25:03+5:30
महाबळेश्वर : ‘येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यांना त्याच दर्जाच्या सुविधा मिळणे आवश्यक ...
महाबळेश्वर : ‘येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यांना त्याच दर्जाच्या सुविधा मिळणे आवश्यक आहेत. पालिकेने त्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या वतीने निधी पुरविण्यात येईल,’ असे आश्वासन राष्ट्रीय अभियान संचालक बिनय कुमार झा यांनी दिले.
स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या महाबळेश्वर पालिकेला भेट देण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय अभियान संचालक बिनय कुमार झा हे येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी स्वागत केले. या दोन दिवसांच्या भेटीत झा यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये महाबळेश्वर शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारे दोन जलस्रोत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सार्वजनिक स्वच्छतागृह, होम कंपोस्टिंग, नाइट व डेली स्विपिंगच्या माध्यमातून होत असलेली शहर स्वच्छता यांची पाहणी केली.
त्याचप्रमाणे, कचरा विलगीकरणाच्या संदर्भात काही घरांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून, त्यांनी पालिकेच्या स्वच्छतेच्या कामाची माहिती घेतली. महाबळेश्वर शहरात अनेक मोठी हाॅटेल आहेत, अशा ठिकाणी शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. अशा हाॅटेलमध्ये कचरा कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते. याची पाहणीही या पथकाने केली. एकंदरीत त्यांनी शहरातील स्वच्छता व विविध प्रकल्पांची पाहणी करून पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
महाबळेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे वेण्णालेक व ग्लॅन ओगल या दोन तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या बाबतीत महाबळेश्वर पालिका स्वयंपूर्ण आहे. अनेक पालिकांना पाण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे, परंतु महाबळेश्वर पालिकेकडे दोन तलाव आहेत. या दोन्ही तलावांची पाहणी या पथकाने केली. तलावांच्या पाहणीसाठी पालिकेेने स्पीड बोटींची व्यवस्था केली होती. या बोटींनी पथकाने तलावातून फेरी मारली. पाणीपुरवठा याची पाहणी केली. येथील तलावातील स्वच्छ पाणी व तलावाचा स्वच्छ परिसर पाहून संचालक बिनय कुमार झा यांनी समाधान व्यक्त केले.
चौकट :
विविध उपक्रमांचे कौतुक
हिलदारीचे कौतुक देशातील सर्वांत स्वच्छ व सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाचा नावलौकिक व्हावा, यासाठी गेले काही महिने महाबळेश्वर पालिकेच्या खांद्याला खांदा लावून हिलदारी ही संस्था महाबळेश्वरात स्वच्छतेचे काम करीत आहे. या संस्थेने शहरात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. हिलदारीच्या या उपक्रमाबरोबरच ते येथे शहर स्वच्छतेसाठी चांगले योगदान दिले आहे.