केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वासच ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 03:34 PM2021-04-28T15:34:44+5:302021-04-28T15:39:26+5:30
Prithviraj Chavan Karad Satara : देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या अक्षम्य चुका व वेळेत निर्णय न घेतल्याने, फाजील आत्मविश्वास बाळगल्याने ही परिस्थिती ओढावली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
कराड : देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या अक्षम्य चुका व वेळेत निर्णय न घेतल्याने, फाजील आत्मविश्वास बाळगल्याने ही परिस्थिती ओढावली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पाच महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, ह्लवैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे.'' मागील १० महिन्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही.
देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगताना ते म्हणाले, केंद्र शासनाने देशभरातील ३९० दवाखान्यांत पीएसए पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की, सरकारने अतिरिक्त १ लाख एम.डी. - (मेट्रिक टन) ऑक्सिजन आयात-खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु, मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे.
ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाइकांचे मिनिटामिनिटाला हताश फोन येत आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत ह्लआपण अत्यंत सुस्थितीत आहोत '' हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता? १ लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयातीचे काय झाले? ५ महिन्यांत ते का आयात केले नाही? ही प्रक्रिया कोणी थांबवली? आतापर्यंत देशभरात मंजूर केलेल्या १६२ पी.एस.ए. पद्धतीच्या ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टपैकी फक्त ३३ दवाखान्यांतच उभा केले आहेत, हे खरे आहे का? या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना ''भारताने कोरोनाला कसे हरवले'' अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत.
आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडले, त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरवस्थेला जबाबदार असलेले आरोग्यमंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.