केंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:31 PM2019-08-31T12:31:36+5:302019-08-31T12:36:15+5:30
पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कºहाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरित करावी लागली. या गावांकडे केंद्रीय पथकाने पाठ फिरवली.
सातारा : पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कऱ्हाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरित करावी लागली. या गावांकडे केंद्रीय पथकाने पाठ फिरवली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या पथकात चित्तरंजन दास, आर. पी. सिंग, व्ही. पी. राजवेदी, मिलिंद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकारी व आयुक्त सुहास दिवशे, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांचा या पथकात सहभाग होता. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार होते.
सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, आबासाहेब पाटील, जिल्हा पदिषदेचे सदस्य प्रदीप पाटील, मंडलाधिकारी नवींद्र भांदिर्गे, ग्रामसेवक टी. एल. चव्हाण, तलाठी दराडे, पोलीस पाटील पवन गुरव यांनी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा तसेच पूरबाधित भागाची माहिती सांगितली.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली आहे. सातारा, वाई, पाटण, कऱ्हाड, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे कोसळली. तर उरलेली घरे ही राहण्यासाठी सुरक्षित राहिलेली नाहीत.
या परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्तांची घरे बांधून द्यावीत, अशी मागणी आहे. या लोकांच्या पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांची आर्थिक बाजू लंगडी झालेली आहे. ही बाजू सावरण्यासाठी केंद्रीय पथकाकडून वस्तुनिष्ठ अहवाल जाणे अपेक्षित आहे.
केवळ तांबवेसारख्या एका गावात पाहणी करून संपूर्ण जिल्ह्याचा अंदाज बांधण्याचे काम झाल्यास नुकसानग्रस्तांवर अन्याय होणार आहे. सातारा जिल्ह्यात १० साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. कऱ्हाड तालुक्यात गुऱ्हाळ घरे आहेत, या माध्यमातून शेतकऱ्यांची व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांची उपजीविका सुरू आहे. केंद्रीय पथकातील तज्ज्ञ म्हणवून घेणारे अधिकारी शेतकºयांना उसाऐवजी भात पीक घ्या, असा सल्ला देताना दिसले.
भात हे पीक जास्त पावसाच्या ठिकाणी येते. यावर्षी अतिवृष्टी झाली, पुढच्या वर्षी तेवढाच पाऊस होईल, असे नाही, त्यामुळे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेला हा अनाहूत सल्ला हास्यास्पद ठरला आहे.
जिल्ह्यातील शेती, सार्वजनिक मालमत्ता, रस्ते यांचे नुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. पाणी योजनांच्या विहिरीमध्ये गाळ साठला आहे. शेतीत पाणी साठून पिके वाया गेली आहेत. अजूनही ठिकठिकाणी पंचनाम्यासाठीही कोणी फिरकले नसल्याच्या शेतकºयांकडून तक्रारी येत आहेत.
अंगापूर परिसरात पंचनामे करण्याआधीच ६५ मिलिमीटर पावसाचा निकष लावला असल्याने शेतकरी मदत मिळेल का ? या चिंतेत आहेत. प्रशासनाचे पंचनामे म्हणजे रामायणातील वानराचे शेपूट असल्याची टीकाही होत आहे.
भागाबाई शेलारांना न्याय मिळणार का?
सातारा तालुक्यातील पाटेघर रोहोट भागात राहणाऱ्या भागाबाई आनंदा शेलार (वय ८९) ६ आॅगस्ट रोजी राहत्या घरात अंगावर भिंत पडून मृत्यू झाला होता. या घटनेचा पंचनामाही झाला. भागाबार्इंच्या कुटुंबीयांना अद्याप शासनाने कोणतीच मदत केलेली नाही. आपत्तीत मृत्यू झाल्यास शासनाकडून चार लाख रुपये मिळतात. या मदतीचे काय झाले? हा प्रश्न आहे.