केंद्रीय पथक येताच गठ्ठे झाले ‘गायब’
By admin | Published: February 18, 2016 09:58 PM2016-02-18T21:58:36+5:302016-02-19T00:20:53+5:30
पंचायत समिती चकाचक : अत्याधुनिक सभागृहासह परिसराचीही रंगरंगोटी; अधिकाऱ्यांच्या गळ्यात आले ‘ओळखपत्र’--बातमीमागची बातमी...
संतोष गुरव -- कऱ्हाड
कोपऱ्यात पडलेले योजनांचे व महत्त्वपूर्ण नोंदींचे गठ्ठे, टेबलावर पडलेली धूळ, कपाटातून बाहेर येत असलेल्या फायली हे चित्र अनेक दिवसांपासून कऱ्हाड पंचायत समितीमध्ये पाहावयास मिळत होते. मात्र, पंचायत सशक्तीकरण अभियानामधील महत्त्वाच्या घटकांची पूर्तता कऱ्हाड पंचायत समितीने पूर्ण केली असल्याने त्याची तपासणी करण्याकरिता व विकास कामांची पाहणीसाठी केंद्रीय स्तरावरील क्षेत्रीय तपासणी पथक येणार असल्याचे समजताच पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांची तारांबळ उडून गेली. व गेल्या अनेक दिवसांपासून अस्ताव्यस्तपणे पडलेल्या ‘त्या’ गठ्ठ्यांना अखेर त्यांची जागा मिळाली.
कऱ्हाड पंचायत समितीने पंचायत सशक्तीकरण अभियानामधील महत्त्वाच्या घटकांची पूर्तता पूर्ण केली असल्याने त्याचा राज्यस्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. याची तपासणी करण्याकरिता व विकास कामांची पाहणीसाठी केंद्रीय स्तरावरील क्षेत्रीय तपासणी समितीमधील रश्मी सारस्वत व अनिंदिता नंदी या महिला अधिकारी यांच्या पथकाने बुधवारी कऱ्हाड पंचायत समितीस भेट दिली.
यावेळी पंचायत समितीमध्ये नियमित स्वच्छतेबरोबर प्रत्येक विभागाची रचना, विभागातील अधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था व महत्त्वाचे गठ्ठे ठेवण्याचे कपाट, जागा तसेच स्वच्छता अशा अनेक विषयांसंबंधी पाहणीबरोबर माहितीही घेतली.
केंद्र स्तरावरील पथक सर्वेक्षणासाठी येणार म्हटल्यावर येथील प्रत्येक विभागातील शिपाई, कर्मचारी व अधिकारी यांनी आपापला विभाग स्वच्छ करून तो व्यवस्थित ठेवून चकाचक ठेवावा, अशा सूचना गटविकास अधिकारी फडतरे यांनी दिल्या. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पंचायत समितीचा क्रमांक बसला असल्याने या ठिकाणी दररोज विविध जिल्ह्यातून, राज्यातून अधिकारी, लोकप्रतिनिधींचे पथक भेटीसाठी येणार हे नक्की. हे पथक आल्यास त्यांना पंचायत समितीमध्ये कोपऱ्यातील अस्ताव्यस्त पडलेले गठ्ठे दिसल्यास पंचायत समितीमधील खऱ्या स्वच्छतेची ओळख होऊ नये. म्हणून पंचायत समितीमधील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आपापल्या विभागांची स्वच्छता करण्यात आली. शिवाय शिक्षण विभागाशेजारी गेल्या अनेक दिवसांपासून पडून असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे गठ्ठेही इतरत्र हलविण्यात आले.
इमारतीच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फायलींच्या गठ्ठ्यांकडे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांचे लक्ष नव्हते. जागेअभावी विभागाच्या कोपऱ्यात ठेवण्यात आलेल्या गठ्ठ्यांवरची धूळ झाडून ते गठ्ठे व्यवस्थित ठेवण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरूपात विभागात स्वच्छता दिसून आली. मात्र, अशी स्वच्छता नियमितपणे का केली जात नाही. ती केली जावी, असे मत व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयातील वातावरण हे नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यांच्याकडून देखील कचरा केला जातो.
मात्र, झालेला कचरा हटविण्यासाठी शासकीय स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असते. त्यांच्यामार्फत नियमित स्वच्छता ही करणे गरजेचे असते. मात्र, केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याचे समजताच त्या कर्मचाऱ्यांसह प्रत्येक विभागातील अधिकारीही झाडून स्वच्छतेच्या व महत्त्वाच्या माहितीच्या नोंदणीसाठी कामाला लागले. तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळ्यात कधी नव्हे तो ओळखपत्र लोंबकळत असताना दिसून येत आहेत.
गठ्ठे गेले जागेवर
कऱ्हाड पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाशेजारी गेल्या सहा महिन्यांपासून पडून असलेले गठ्ठे हे केंद्रीय स्तरावरील पथक पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने हलविण्यात आले आहेत. स्वच्छ आणि सुंदर पंचायत समिती दिसण्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील कागदपत्रांचे गठ्ठे कपाटबंद ठेवले आहेत.
२० खोल्या, १ सभागृह अन् १ रेकॉर्डरुम
कऱ्हाड पंचायत समितीत एकूण दोन मजले आहेत. दोन मजल्यांच्या इमारतींमध्ये २० खोल्या, १ सुसज्ज असे सभागृह असून, १ रेकॉर्डरुम देखील आहे. मात्र याठिकाणी सदस्यांना बसण्यासाठी एक रुम देखील नाही.
२० खोल्यांच्या स्वच्छतेसाठी फक्त दोन तास
कऱ्हाड पंचायत समितीत एकूण दोन मजले आहेत. दोन मजल्यांच्या इमारतींमध्ये २० खोल्या या खोल्यांमधील महत्त्वाच्या फायलींची स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. यासाठी त्यांना दोन तास लागले.