केंद्रीय पथकाकडून मिरजेत सोनोग्राफी केंद्रास टाळे
By admin | Published: May 17, 2017 09:21 PM2017-05-17T21:21:47+5:302017-05-17T21:21:47+5:30
आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने मिरजेत मंगळवारी डॉ. सोमशेखर पाटील यांच्या सोनोग्राफी केंद्राची तपासणी करून केंद्राला टाळे ठोकले
मिरज : आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने मिरजेत मंगळवारी डॉ. सोमशेखर पाटील यांच्या सोनोग्राफी केंद्राची तपासणी करून केंद्राला टाळे ठोकले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता व म्हैसाळ भ्रूणहत्याकांड प्रकरणातील चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यासोबत बैठक घेऊन पथकाने डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या चौकशीबाबत माहिती घेतली. पंचायत समितीत आशा वर्कर्स व मदतनीसांची बैठक घेऊन भ्रूणहत्येचे प्रकार रोखण्याबाबत सूचना दिल्या.
म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांड प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाचे केंद्रीय पथक सांगलीत आले आहे. त्यात डॉ. सुषमा दुरेजा, डॉ. वीणा धवन, डॉ. जिग्नेश ठक्कर, डॉ. वर्षा देशपांडे यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी या पथकाने म्हैसाळला भेट दिल्यानंतर डॉ. सापळे यांच्याशी चर्चा केली. आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या समितीने डॉ. खिद्रापुरे याच्या कृत्याची चौकशी पूर्ण केली असून, याबाबत सोमवारी आरोग्य संचालकांकडे अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागात खिद्रापुरे याने हत्या केलेल्या स्त्री भ्रूणांची व न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील सुविधांची केंद्रीय पथकाने पाहणी केली. बैठकीनंतर पथकाने मिरजेतील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सोमशेखर पाटील यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रातील रेकॉर्ड व कागदपत्रांची तपासणी केली. तेथील रेकॉर्डमध्ये अनियमितता आढळली. सोनोग्राफी रजिस्टरमध्ये रुग्णांच्या सह्या नसल्याने रजिस्टरसह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी व डॉ. राजेंद्र कवठेकर यांना पाचारण करून सोनोग्राफी केंद्रास टाळे ठोकले. तेथील रेकॉर्डची छाननी करण्याच्या सूचना पथकाने महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. या सोनोग्राफी केंद्रास यापूर्वीही एकदा टाळे ठोकण्यात आले होते.
केंद्रीय पथकातील चारपैकी दोघींनी वेगवेगळ्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या. यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. पंचायत समितीत आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, मदतनीसांची बैठक घेऊन स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी सतर्क रहावे. असे प्रकार कोठे सुरू असल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही या पथकाने केले. गावातील गर्भवती महिला अचानक दिसेनाशी झाल्यास तिची चौकशी करून माहिती घेण्याची सूचना देण्यात आली. बैठकीस सुमारे १८३ महिला उपस्थित होत्या. बंद सभागृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना बाहेर काढून पथकाने महिलांशी संवाद साधला.
सिव्हिलच्या डॉक्टरांमुळेच प्रकरण उघडकीस!
अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगली शासकीय रुग्णालयामधील (सिव्हिल) डॉक्टरांमुळेच खिद्रापुरे प्रकरण उघडकीस आल्याचा दावा केला. अवैध गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या पीडित महिलेचा मृत्यू अशक्तपणामुळे झाल्याचे भासविण्यात येत होते. मात्र सिव्हिलमधील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतल्याने गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांकडेही विचारपूस
केंद्रीय पथकाने डॉ. सोमशेखर पाटील यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या काही महिला रुग्णांची विचारपूस केली. गर्भवती महिलांना यापूर्वी मुली किती आहेत, याचीही माहिती घेतली. अगोदर मुली असल्याने आता मुली नको असल्याचे काही रुग्णांनी सांगितल्याने सोनोग्राफी केंद्रातील रेकॉर्डची कसून तपासणी करण्यात आली.