पेट्रोलचे शतक पूर्ण; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:15+5:302021-07-04T04:26:15+5:30
सातारा : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांची पिळवणूक सुरू आहे. आता तर पेट्रोल एकशे पाच ...
सातारा : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांची पिळवणूक सुरू आहे. आता तर पेट्रोल एकशे पाच रुपयांच्या पुढे गेले आहे. पेट्रोलने शतक पूर्ण केले, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात बॅट, पॅड घालून ज्या पद्धतीने शतक केल्यावर खेळाडू हातातील बॅट वर करतात, त्या पद्धतीने निषेध आंदोलन केले.
दिवसेंदिवस गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे त्रस्त झाले असून, केंद्र सरकारविरोधात भयंकर असंतोष आहे. घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली. केंद्र शासनाचे गणित सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांना ही दरवाढ जीव नकोसा करणारी आहे, त्यामुळे शनिवारअखेर हे पाऊल उचलावे लागले, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकार सामान्य जनतेच्या सामान्य अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. वारंवार घरगुती वापराच्या गॅसच्या किमती वाढत आहेत, यावर सरकारचे अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. पेट्रोल, डिझेल दरवाढ तसेच नित्याच्याही वस्तू महाग झाल्या आहेत. केंद्र सरकारचे याकडे लक्ष नाही. केंद्र सरकारने ताबडतोब गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी व सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढ त्वरित कमी करावी अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, मुंबई बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, संगीता साळुंखे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, अतुल शिंदे, राजेंद्र लवंगारे, गोरखनाथ नलवडे, पूजा काळे, सीमा जाधव, आप्पा येवले, सागर कांबळे, निवास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. ( छाया : जावेद खान)