चड्डी बनियान मोर्चा धडकला साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:12+5:302021-01-14T04:33:12+5:30
सातारा : शिरवळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुकारलेला चड्डी, बनियान मोर्चा ...
सातारा : शिरवळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुकारलेला चड्डी, बनियान मोर्चा बुधवारी साताऱ्यात धडकला. जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे .
जिल्हाधिकारी स्वतः जोपर्यंत चर्चा करणार नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याची आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. इम्रान काझी, अजिंक्य कांबळे, हितेश जाधव, गौरव घोलप, अनुप सूर्यवंशी यांनी शिरवळ ते सातारा असा सलग तीन दिवस ६५ किलोमीटर मोर्चाद्वारे चालत येऊन जिल्हाधिकाऱ्यांना शिरवळ औद्योगिक वसाहतीत लक्ष घालावे असे साकडे निवेदनाद्वारे घातले आहे. खंडाळा तालुक्यात एकूण ४५३ कंपन्या असून या कंपन्या स्थानिकांना डावलून बाहेरील युवकांना प्राधान्य देतात. कामगारांना कामावरून काढून टाकणे, कामगारांना नोकरीत कायम न करणे, कंपनीचे रुजू पत्र न देताना कामगारांना ठेकेदाराच्या फर्मचे पत्र देणे यामुळे खंडाळा व शिरवळ या परिसरात बेरोजगारी वाढली आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील शांततेला गालबोट लागत असल्याची तक्रार भूमिपुत्रांची आहे. या आंदोलकांनी बुधवारी दुपारी भर उन्हात ठिय्या मारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली.
प्रशासनाने स्थानिक भूमिपुत्रांशी स्पष्ट चर्चा करून त्यांना न्याय द्यावा तसेच या प्रकरणातील पदाचा गैरवापर करणाऱ्या समाजकंटकांना रोखावे, अशी मागणी अनुप सूर्यवंशी व इम्रान काझी यांनी केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या या आंदोलनाला लॉ किम मोटर्स ग्रुपच्या कामगारांनी पाठिंबा दिला आहे.