चाफळची सितामाई यात्रा रद्द, मकरसंक्रांती दिवशी मंदिर राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 03:50 PM2022-01-07T15:50:47+5:302022-01-07T15:51:34+5:30
तीर्थक्षेत्र चाफळला मोठ्या संख्येने महिलांची मकरसंक्रांत सितामाई यात्रा भरते.
चाफळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ रोजी मकरसंक्रांती दिवशी चाफळ येथे भरणारी सितामाई यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच शासन आदेशानुसार यादिवशी राममंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीराम देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
तीर्थक्षेत्र चाफळला मोठ्या संख्येने महिलांची मकरसंक्रांत सितामाई यात्रा भरते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशानुसार ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिर परिसरात २०० मीटर अंतरावर संचारबंदी व जमावबंदी आदेश पारित करण्यात आले असून यादिवशी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
भाविकांनी यादिवशी राममंदिर परिसरात दर्शनासाठी तसेच महिलांनी मंदिरात वसा घेण्यासाठी येऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे पालन करून ट्रस्ट व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, व्यवस्थापक धनंजय सुतार व विश्वस्त मंडळाने केले आहे.