चाफळचा श्री रामनवमी यात्रा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:14+5:302021-04-12T04:36:14+5:30
चाफळ : चाफळ, ता.पाटण येथे दि. १३ ते २३ एप्रिल रोजी होणारा श्रीरामनवमी उत्सव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या ...
चाफळ : चाफळ, ता.पाटण येथे दि. १३ ते २३ एप्रिल रोजी होणारा श्रीरामनवमी उत्सव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली.
रामनवमी यात्रेस मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या भाविकांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी यात्रा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत श्रीराम देवस्थान ट्रस्टने राम मंदिराची दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे बंद केली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात असून, मंदिरातील धार्मिक विधी मंदिराचे पुजारी, मानकरी, स्वामी महाराज, विश्वस्त यांनी पार पाडायचा आहे. या कालावधीत धार्मिक विधी झाल्यानंतर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. धार्मिक विधी सोडून मंदिर परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, बाळासो स्वामी, व्यवस्थापक धनंजय सुतार यांनी दिली.