चाफेश्वराच्या मंदिरामुळं नकाशावर आलं चाफळ!
By admin | Published: March 15, 2015 12:15 AM2015-03-15T00:15:58+5:302015-03-15T00:15:58+5:30
समर्थांचे वास्तव्य : राम मंदिरालाही आहे वेगळा इतिहास
हणमंत यादव ल्ल चाफळ
तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरास पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चाफळ गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आपणास आजमितिस पाहावयास मिळत आहे. मात्र चाफळ या नावामागची कहाणी काही वेगळीच आहे. येथील उत्तरमांड नदीपात्रामध्ये साधारणत: १२०० वर्षांपूर्वीचे एक हेमाडपंथी बांधकाम केलेले पुरातन महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरास पूर्वी चाफेश्वर मंदिर म्हणून ओळखले जायचे. त्याकाळी या मंदिराच्या परिसरात ४५ ब्राह्मण व काही मराठी कुटुंबे वास्तव्य करत होती. यातील शहाणे कुटुंबीय या मंदिराची देखभाल करत होते. मात्र आश्चर्य वाटेल की, या ४५ कुटुंबाच्या वस्तीस स्वत:चे असे नावच नव्हते. कालांतराने येथील चाफेश्वर मंदिरामुळे या वस्तीस चाफळ म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही हे मंदिर सुस्थित असून, ते शिवकालीन इतिहासाची दिमाखात साक्ष देत आहे.
समर्थ रामदास स्वामी हे भटकंती करत असताना त्यांनी चाफळच्या स्मशानभूमीत स्थानिक लोकांच्या मदतीने १६४८ मध्ये श्रीराम मंदिराची उभारणी केली. व खऱ्या अर्थाने चाफळच्या मंदिरात श्रीरामाचा उत्सव सुरू झाला. त्याकाळात पुढे छत्रपती शिवाजी महाराज व समर्थांची शिगंणवाडी परिसरात प्रथमच भेट झाली. या भेटीदरम्यान छत्रपती शिवरायांनी समर्थांच्या कार्यास हातभार म्हणून ३३ गावे, ४१९ बिघे जमीन व एक कुरण सनद म्हणून श्रीरामाच्या सेवेसाठी दान म्हणून दिली होती. याची नोंद श्रीराम मंदिराच्या आवारातील फलकावर पाहावयास मिळते. पुढे समर्थांनी मिळालेल्या सनदेतून त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामींच्यावर स्थानिकांचा सहभाग घेऊन श्रीरामाची पूजा, अर्चा, सेवा करण्याची जबाबदारी सोपवली होती. गंगाधर स्वामींनीही बंधूंचा आदेश माणून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी गंगाधर स्वामींनी सेवेत सामील असलेल्या प्रत्येक कुळास उदरनिर्वाहासाठी जमिनी कसण्यास दिल्या होत्या. आजही या जमिनी श्रीराम स्वामी संस्थानच्या नावे असून, सातवी पिढी आज या जमिनी कसताना दिसत आहेत.
यानंतर इ. स. १९६७- ६८ च्या काळात पूर्वीच्या श्रीराम मंदिरास भूकंपाने तडे गेल्याने त्या जागेवर मुंबईचे उद्योगपती दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांनी स्वखर्चाने सध्याच्या श्रीराम मंदिराची स्थानिकांच्या सहकार्याने उभारणी केली. १९७४ च्या दरम्यान याठिकाणी श्रीराम देवस्थान ट्रस्टची उभारणी करण्यात आली. व २०११ साली या मंदिरास शासनाचा तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला.