कोपर्डे हवेलीतील कोरोनाची साखळी तुटता तुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:40 AM2021-05-11T04:40:50+5:302021-05-11T04:40:50+5:30
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेलीत एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने औषधोपचार सुरू आहेत. ...
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेलीत एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने औषधोपचार सुरू आहेत. पंधरा दिवसांपासून गावातील युवक आणि युवा मंचचे कार्यकर्ते कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, त्याला यश येत नाही.
कोपर्डे हवेली हे जिल्हा परिषद गटातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
रुग्ण वाढत असल्याने गावातील युवकांनी अनेक प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये रुग्णांची टेस्ट करून कोरोना सेंटरमध्ये दाखल करणे, काही लोकांच्या जेवणाचे डबे पोहोच करणे,
गृहविलगीकरणातील रुग्णांना घरी जाऊन भेटणे, गावातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचा सल्ला घेणे, गावातील डॉक्टर बाहेरगावी असले तरी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन देणे. आहाराविषयी माहिती देणे आदी मार्गदर्शन केले जात आहे.
सध्या गावात सुमारे २० ते २५ रुग्ण घरी उपचार घेत आहेत, तर काही कोरोना सेंटर व खासगी दवाखान्यांत उपचार सुरू आहेत. एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाने पाच ते सहा लोकांचे बळी घेतले आहेत.
त्यासाठी गावातील युवक कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याला हवे तसे यश मिळत नाही.
चौकट....
अंगावर आजार काढल्याने अनेकांना संसर्ग होत आहे. वेळेत उपचार घेतले जात नाहीत. विलगीकरणाची मुदत संपण्यापूर्वीच घरातील लोकांशी संपर्क येत आहेत. जनता कर्फ्यू असूनही रुग्ण कमी झाले नाहीत. दवाखान्याचा खर्च परवडणारा नसल्याने मदत करताना मर्यादा येत आहेत. आता खरी गरज आहे, ती लसीकरणाची. जास्तीतजास्त लसीकरण होणे गरजेचे आहे.
दररोज रात्री, दिवसा केलेल्या कामांची माहिती ऑनलाइन मीटिंगद्वारे घेतली जाते.