एका गाडीसाठी सभापती अन् उपसभापतींच्या तडजोडी
By admin | Published: February 13, 2015 12:10 AM2015-02-13T00:10:22+5:302015-02-13T00:50:47+5:30
पाटण पंचायत समिती : शासनाची गाडी वापरावरून राजकारण
अरुण पवार - पाटण -पंचायत समितीत देसाई व पाटणकर गटाचा फिप्टी-फिप्टी वाटा आहे. पहिल्या अडीच वर्षांचे सभापतिपद देसाई गटाकडे होतो. आता पाटणकर गटाच्या संगीता गुरव या सभापती आहेत. तर उपसभापती डी. आर. पाटील हे देसाई गटाचे आहेत. मात्र, या दोघांना शासनाची एकच गाडी असल्यामुळे त्या गाडीवरून कुरबुरी वाढल्या आहेत.
आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्याला माहीत आहे. पंचायत समितीच्या सत्तेतही यावेळी असाच संघर्ष सुरू आहे. सभापती, उपसभापतींच्या निवडी करायच्या झाल्यास त्याही चिठ्ठीवर म्हणजे नशिबावर अवलंबून होत्या. सध्याच्या सभापती संगीता गुरव यांचे गाव ढेबेवाडी विभागातील धामणी तर उपसभापती डी. आर. पाटील यांचे गाव महिंद हेही याच विभागातील. त्यामुळे हे दोघेही दररोज पाटणला ये-जा करून पंचायत समितीचा कारभार पाहतात.
त्यांच्या दिमतीला असणाऱ्या शासनाच्या बोलेरो गाडीला तितकेच महत्त्व आहे. कारण खासगी गाडीपेक्षा शासनाच्या गाडीतून प्रवास करणे हे सभापती-उपसभापतींसाठी मानाचे आहे. पण नियमानुसार सभापतींनी वीस दिवस तर उपसभापतींना दहा दिवस गाडी वापरता येणार आहे. त्यामुळे आठवड्यातील अमूक दिवशी माझ्याकडे गाडी पाहिजे, असा हट्ट असल्यामुळे ही तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे गेली; पण ते तरी काय बोलणार? चालकाचे हाल होतायत. अजूनही हा तिढा सुटला नाही. मात्र, आजपर्यंत केवळ तडजोडीने गाडीचा वापर सुरू आहे.
गटविकास अधिकारी व सभापती यांच्या समन्वयातून मला ठरवून दिलेल्या दिवशी माझ्या ताब्यात गाडी असावी. ठरलेल्या क्रमात कोणत्याही परिस्थितीत बदल होता कामा नये.
- डी. आर. पाटील, उपसभापती
मला वीस दिवस गाडी वापरण्याचा अधिकार आहे. उपसभापतींना दहा दिवस गाडी दिली जाते. उपसभापतींनी सलग दोन दिवस गाडी वापरावी, असा प्रस्ताव मी ठेवला आहे.
- संगीता गुरव,
सभापती
सभापतींना असणारी गाडी उपसभापतींना महिन्यातून दहा दिवस द्यावा, असा अध्यादेश आहे. त्यामुळे त्या दोघांनी विचारविनिमय करून गाडी वापराचे वेळापत्रक ठरवावे.
- अरविंद पाटील, गटविकास अधिकारी