संचालकांमधून निवडला जाणार अध्यक्ष

By admin | Published: May 31, 2015 10:13 PM2015-05-31T22:13:06+5:302015-06-01T00:15:37+5:30

शिक्षक बँक निवडणूक : गुरूजींच्या बँकेत वाढणार घोडेबाजार

Chairperson to be elected from the directors | संचालकांमधून निवडला जाणार अध्यक्ष

संचालकांमधून निवडला जाणार अध्यक्ष

Next

कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँक ही जिल्ह्यातील सहकारातील एकमेव संस्था अशी होती की या बँकेत मतदारांमधून थेट अध्यक्ष निवडला जायचा. सर्व मतदार आपल्या मतदानातून योग्य अध्यक्ष निवडायचे. त्यामुळे अध्यक्षपदाला एक वेगळे राजकीय, संघटनात्मक वलय असायचे. मात्र ९७ व्या घटनादुरूस्तीमुळे आता शिक्षक बँकेतही इतर संस्थांप्रमाणे संचालकांतून अध्यक्ष निवड होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपद मिळवणे व ते पाच वर्ष टिकविण्यासाठी आता स्पर्धा राहून गुरूजींच्या या बँकेतही घोडेबाजार होणार हे निश्चित. त्यामुळे सत्ता कोणाचीही आली तरी संचालक फोडाफोडी होऊन अध्यक्षपदाची खूर्ची बदलती राहणार.२१ आॅक्टोबर १९२४ रोजी दिवंगत कृ. भा. बाबर यांच्या पुढाकाराने १४ प्रवर्तकांनी मसूर (ता. कऱ्हाड) येथे ‘सातारा जिल्हा लोकल बोर्ड प्राथमिक शिक्षक सोसा. लि’ या नानावे संस्थेची स्थापना केली. नंतर १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यातील ९ तालुक्यांसाठी स्वतंत्र शिक्षक बँक वेगळी करण्यात आली. स्वतंत्र झालेल्या शिक्षक बँकेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मारूती शंकर कुलकर्णी यांना मिळाला. त्यांनी आपल्या आदर्श कामकाजातून बँकेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेवून बँकेची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. १९४८ पासून बँकेच्या ६७ वर्षांत आत्तापर्यंत थेट मतदारांमधून २९ जणांनी बँकेचे अध्यक्षपद भुषविले व बँकेच्या प्रगतीसाठी आपले योगदान दिले.परंतु ९७ व्या घटनादुरूस्तीनुसार आता शिक्षक बँकेतील ही अध्यक्षीय पद्धत बंद होणार आहे. तर अध्यक्षाची निवड ही निवडून गेलेल्या संचालकांच्या बहुमतातून होणार आहे. त्यामुळे यापुढील बँकेच्या राजकारणात प्रत्येक संचालकाला महत्त्व प्राप्त होणार आहे. तर त्यांना योग्य तो मान-सन्मान देखील मिळणार हे निश्चित. बँकेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी व ते पद पाच वर्षे टिकविण्यासाठी बँक संचालकांत मोठा घोडेबाजार पुढील काळात पाहायला मिळणार हे निश्चित. तर पाच वर्षांत अध्यक्षपदासाठी संगीतखुर्चीचा खेळ होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे. (प्रतिनिधी)
पुस्तकेंचा कार्यकाल वादग्रस्त
कधी शिक्षकसंघ तर कधी शिक्षक समितीच्या ताब्यात बँकेची सत्तासूत्रे राहिली आहेत. २००४ मध्ये समितीच्या विश्वास चव्हाण यांच्या हातातून संघाचे सिद्धेश्वर पुस्तके यांनी बँक ताब्यात घेतली. मात्र त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द सर्वात वादग्रस्त ठरली. तर त्यांच्याच काळात बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये अधिक वादावादीचे प्रकार घडून बँकेच्या सभा चांगल्याच गाजल्या.

Web Title: Chairperson to be elected from the directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.