चक दे सातारा... छोट्याशा खेडेगावातून तिने जग जिंकलं, टीम इंडियाची वैष्णवी

By दीपक शिंदे | Published: November 19, 2023 12:44 PM2023-11-19T12:44:31+5:302023-11-19T12:45:07+5:30

तिच्या जडणघडणीची एक एक आठवण भारावून सांगत होते.

Chak de Satara... She conquered the world from a small village, Vaishnavi of Team India | चक दे सातारा... छोट्याशा खेडेगावातून तिने जग जिंकलं, टीम इंडियाची वैष्णवी

चक दे सातारा... छोट्याशा खेडेगावातून तिने जग जिंकलं, टीम इंडियाची वैष्णवी

दीपक शिंदे

फलटण तालुक्यातल्या आसू गावात स्वत:च्या आणि चार जनावरांच्या पोटापुरती शेती. खेळाचं तसं काही नाव-गावच नाही. पोरगी शाळेत जात होती. तिसरीत शाळेनं स्पर्धा घेतली. त्यात पहिला नंबर आला. शाळेतून फलटणात गेली. तिथून तालुक्यात, तालुक्यातून जिल्ह्यात, तिथून बालेवाडीत अन् आता सगळं जग फिरून येतीया. पुण्यातून मला घरी न्या म्हणून मागं लागणारी वैष्णवी आता खेळात चांगली रमलीय. केवळ आमच्या आसू गावचंच नाही, तर आता देशाचं नावही उज्ज्वल करतीया. भारतीय हॉकी संघात महाराष्ट्रातून निवड झालेल्या वैष्णवीचे वडील विठ्ठल फाळके तिच्या जडणघडणीची एक एक आठवण भारावून सांगत होते.

वैष्णवी विठ्ठल फाळके, गाव आसू, ता. फलटण, जिल्हा सातारा. ही तिची ओळख आता वैष्णवी फाळके ज्युनिअर हॉकी संघाची कप्तान आणि भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू अशी झाली आहे. ही ओळख तयार करण्यात सर्वांनाच खूप मेहनत घ्यावी लागली. वैष्णवीचे आई-वडील, प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि तिची अचूक निवड करणारे विकास भुजबळ. बालेवाडीतही तिच्यावर खेळाचे चांगले संस्कार झाले आणि भारतीय संघातील एक चांगली हॉकी खेळाडू म्हणून ती सध्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे.

वैष्णवी आठव्या वर्षी घराबाहेर पडली कधीही गाव आणि घर सोडून बाहेर न गेलेली मुलगी पुण्याला पाठवायची म्हणजे आई-वडिलांनी काळजावर दगडच ठेवला. शहरातील वातावरणाला गावाकडची मुले थोडी दबकूनच राहतात. तिचं वयही असं होतं, की फार काही कळतही नव्हते. पुण्यातून मला घेऊन परत गावाकडे चला म्हणून ती हट्ट करायची.  

अशी हाेते खेळाडूंची निवड

विकास बबन भुजबळ स्वत: हॉलिबॉल आणि ॲथलिट खेळाडू. परिस्थितीमुळे लवकर नोकरी करावी लागल्याने खेळाडू होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले, पण आपण एखादा तरी मोठा खेळाडू घडवायचा, असा चंगच त्यांनी बांधला होता.
क्रीडा प्रबोधिनीबाबत त्यांना माहिती होती. येथे प्रवेश मिळविण्यासाठी क्रीडा नैपुण्य चाचणी आवश्यक होती. मग, त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या.

भुजबळ यांनी चांगल्या खेळाडूंची निवड करून त्यांना स्वत:च्या घरी फलटण येथे आणून विशेष प्रशिक्षण दिले. त्यांच्या पत्नी आणि मुलांनीही यासाठी त्यांना मदत केली. गरीब खेळाडूंमधील कौशल्य पाहून त्यांची क्रीडा प्रबोधिनीत निवड झाली.

विकास भुजबळ या प्राथमिक शिक्षकाने केवळ मुलांची निवडच केली नाही, तर त्यांची पोटच्या पोरांसारखी काळजी घेतली. त्यांना तत्कालीन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शाम देशपांडे यांनीही मदत केली.  तसेच सोबत असणारे रवींद्र ननावरे, पांडुरंग निकाळजे, विजयकुमार नाळे, उत्तम चोरमले, संजय जगदाळे या शिक्षकांचीही मदत झाली.

अक्षता ढेकळे, ऋतुजा पिसाळ, आदित्य लाळगे, पूजा शेंडगे, स्वाती जाधव, भाग्यश्री शिंदे, प्रज्ञा भोसले, उत्कर्षा काळे, राहुल शिंदे, आकाश शिंदे, ऐश्वर्या बेलदार, प्रणाली नाळे, पूजा जोरवर, रुचिता कदम, रणजीत सोडमिसे, मलिक शेख, नीलेश आवळे, नाना पिसाळ यांसारखे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले.
 

 

Web Title: Chak de Satara... She conquered the world from a small village, Vaishnavi of Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.