चाकं थबकली.. भावना प्रकटली !

By admin | Published: February 1, 2017 12:01 AM2017-02-01T00:01:05+5:302017-02-01T00:01:05+5:30

मराठा समाजाचा चक्काजाम : महामार्गावर वाढे फाट्यानजीक दोन तास वाहनं ठप्प; मध्यभागी देशभक्तीपर गीतांचा जागर

Chakab thabakali .. the emotion appeared! | चाकं थबकली.. भावना प्रकटली !

चाकं थबकली.. भावना प्रकटली !

Next



सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी (दि. ३१) अभूतपूर्व असा इतिहास घडला. महामार्गाच्या मध्यभागी बसून तब्बल दोन तास सलग देशभक्तीच्या गीतांचा गजर सुरू होता. महामार्गाच्या निर्मितीपासून तब्बल दोन तास आंदोलनाच्या निमित्ताने महामार्ग बंद राहणे, ही इतिहासातील बहुधा पहिलीच घटना घडली असावीे.
सकल मराठा समाजातर्फे या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. येथील वाढे फाट्यावर सकाळपासूनच आंदोलकांची गर्दी झाली होती. आयोजकांनी अत्यंत नेटके नियोजनही केले असल्याने कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली नाही. पुण्याकडून येणारी वाहतूक वेण्णा पुलापर्यंतच अडवण्यात आली होती. कऱ्हाडकडून येणारी वाहतूक देगाव फाट्यावर अडविण्यात आली होती. लोणंदच्या दिशेला वाढे गावापाशी तर सातारा शहरातून येणारी वाहने हनुमान मंदिराच्याजवळ अडविण्यात आली होती. बंदोबस्तावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
सकाळी ठीक ११ वाजता चक्काजाम आंदोलन सुरू झाले. हातामध्ये भगवे झेंडे घेतलेले स्वयंसेवक ते फडकवत होते. ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा झाली आणि शेकडो आंदोलक रस्त्याच्या मध्यभागी बसले. तळपत्या उन्हाची तमा न बाळगता हे आंदोलन पुढे दोन तास शांततेच्या मार्गाने सुरू राहिले.
लिंब पंचक्रोशीतील सप्तक सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या कलाकारांनी ‘स्वर सह्याद्रीचा’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. ‘जय जय महाराष्ट्र माझा... गरजा महाराष्ट्र माझा’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’, ‘जयोस्तुते जयोस्तुते’ अशी एक वरचढ देशभक्तीपर गीतांनी वातावरण चैतन्यमय झाले. खेळ मांडियेला, माउली माउली, मला जाग आली तुझ्या लेकरांची ही भक्तीगीते सादर झाली. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, नदीच्या पल्याड आईचा डोंगर, जेजुरीच्या खंडेराया जागराला या गीतेही सादर करण्यात आली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सदस्य किरण साबळे -पाटील, राजू भोसले, नगरसेवक अमोल मोहिते, धनंजय जांभळे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, जितेंद्र सावंत, सुनील सावंत आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या एकजुटीमुळे हे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठ्यांच्या हातात पूर्वी तलवारी होत्या, आता टाळ आहेत, हेच मोठे दुर्दैव आहे. केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मुंबईतल्या भव्य मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा.’ (प्रतिनिधी)
नेते मंडळीही मांडी घालून महामार्गावर
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनात प्रस्थापित नेतेही आंदोलकांच्या भूमिकेत रस्त्यावर मांडी घालून बसले होते. यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, किरण साबळे-पाटील, नगरसेवक अमोल मोहिते, धनंजय जांभळे, संग्राम बर्गे आदी नेते आणि कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसून या आंदोलनात सहभाग नोंदविला.
वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट
शहरातील मुख्य पोवई नाक्याबरोबरच महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चक्काजाम आंदोलनामुळे शुकशुकाट जाणवत होता. पोवई नाक्यापासून वाढे फाटा रस्त्यावरून तुरळक चारचाकी वाहन सोडले तर अन्य वाहने या रस्त्यावर दिसत नव्हती. विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी होणारे मराठा बांधव पुरुष भिक्षेकरी गृहापासून आपल्या चिमुकल्यांसह चालत आंदोलन स्थळापर्यंत पायी रपेट मारली..
या झाल्या घोषणा
जय भवानी, जय शिवाजी, कोण म्हणतंय देत नाय... घेतल्याशिवाय राहत नाय, एक मराठा... लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय.. जय भवानी जय शिवराय, येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं..., आम्हाला आमचा हक्क हवाय, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी केल्या.
‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर व्यवसाय
महामार्गावर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढे फाटा परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनी ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर व्यवसाय केला. यातील अनेक व्यावसायिकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा करून ठेवला होता. आंदोलनस्थळी येणाऱ्या आंदोलकांना या व्यावसायिकांनी ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर खाद्य पदाथ-पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली.
रणरणत्या उन्हात
तळपले मराठा..
चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजल्यापासून मराठा बांधव महामार्गावर जमू लागले होते. साधारण साडेदहा वाजता जत्थ्याने आंदोलक महामार्गावर येऊ लागले. पावणे अकराच्या सुमारास आंदोलक महामार्गावर मांडी घालून बसले. त्यानंतर आंदोलन संपेपर्यंत म्हणजे सुमारे दोन-अडीच तास डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याची तमा न बाळगता त्यांनी आंदोलन यशस्वी केले

Web Title: Chakab thabakali .. the emotion appeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.