वीस वर्षे साथ देणारी चकदेव पठाराची शिडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:35 PM2017-10-13T23:35:48+5:302017-10-13T23:41:37+5:30
सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोºयात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित असलेल्या लोखंडी शिडीला सत्तावीस वर्षे झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोºयात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित असलेल्या लोखंडी शिडीला सत्तावीस वर्षे झाली आहेत. ट्रेकिंगच्या आवडीमुळे या शिडीचे साक्षीदार असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या ‘सेतू’ला भेट देऊन आठवणींना उजाळा दिला.
जावळी खोºयातील अतिदुर्गम व मागासलेल्या कोयना-कांदाटी खोºयात कोयना धरणाच्या निर्मितीमुळे शिवसागर जलाशय सर्वदूर विस्तारला आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात अनेक पिढ्या जगणारे येथील भूमिपुत्र विस्थापित झाले. त्यापैकी काहीजण कोकण, ठाणे, रायगड, सोलापूर व सातारा जिल्ह्यात जागा मिळेल त्याठिकाणी स्थायिक झाले. मात्र, आजही अनेकजण आपल्या मातृभूमीच्या ओढीने येथील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात.
जावळी तालुक्यातील सातारा जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून चकदेव पठाराकडे पाहिले जाते. देशातील सर्वात कमी मतदान केंद्र म्हणून चकदेव शिंदीची नोंद झाली होती. या पठारावरून पलीकडे चिपळूण तालुक्यात जाण्यासाठी पूर्वी वेलाच्या शिडीचा वापर केला जात होता. या व्यतिरिक्त कोणतेही दळणवळणाचे साधन या ठिकाणी नव्हते. या शिडीचा वापर करून येथील ग्रामस्थ चिपळूणला बाजारहाट करण्यासाठी जात होते. १९९० मध्ये तत्कालीन शाखा अभियंता डी. एच. पवार यांनी माजी आमदार दिवंगत जी. जी. कदम यांच्या प्रयत्नामुळे वेलाच्या शिडीऐवजी लोखंडी शिडी बसविण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे १९९० मध्ये चकदेव पठारावर जाऊन लोखंडी शिडीसाठी माप घेण्यात आले. त्यानुसार सातारा येथे शिडी बनविण्याचे काम सुरू झाले. शिडीचा सांगडा व वेल्डिंगसाठी आवश्यक लागणारी यंत्रणा बामणोलीपासून लाँचने आणण्यात आली. त्यानंतर स्थानिक भूमिपुत्र व कर्मचाºयांच्या मदतीने हे साहित्य डोंगरावरील चकदेव पठारापर्यंत आणण्यात आले. त्या ठिकाणी शिडी तयार करून उताराला ही शिडी जोडून घेण्यात आली. शिडी जोडल्यानंतर चिपळूणला जाणे सोयीस्कर झाले. शिडीला सत्तावीस वर्षे झाल्यानंतर बांधकाम विभागाचे डी. एच. पवार, विजय बोबडे, सुनील चतुर, शाम मोने, भरत साळुंखे, शाखा अभियंता घनशाम पवार, गणेश कर्वे, नीलेश आगवेकर आदींनी या ‘सेतू’ला भेट देऊन आठवणींना उजाळा दिला.
स्थानिकांच्या मदतीनेच मार्गक्रमण
ही शिडी लोखंडी कड्यामध्ये अडकविण्यात आली आहे. संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळे या ठिकाणी एकट्याने प्रवास करणे धोक्याचे आहे. पहाटे पाच वाजता साताºयातून निघाल्यानंतर चकदेवला जाण्यासाठी दुपार होते. चकदेव येथे जंगम वस्ती असून, पूर्वसूचना दिली तर भात व आमटी खाण्यासाठी मिळते. या ठिकाणी शाळा, आरोग्य सुविधा नसल्यामुळे स्थानिकांच्या मदतीनेच मार्गक्रमण करावे लागते. येथील शंकराच्या मंदिरात दर्शन घेतल्याने थकवा दूर होतो, अशी माहिती पर्यटकांनी दिली.
पर्यटकांसाठी ठरतेय पर्वणी
चकदेव पठाराला अनेक पर्यटक भेटी देतात. पावसामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य खुलून गेले आहे. फुलांचा रंगोत्सव सुरू झाल्याने हे मनोहरी दृश्य पर्यटकांसह ट्रेकिंगसाठी येणाºया साहसी वीरांना भुरळ घालत आहे. पर्यटकांना चकदेव, शिंदी व वळवण म्हणजे मिनी काश्मीर असल्याचा भास होत आहे. पर्यटन विभागाने या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पर्यटनप्रेमी व ग्रामस्थांमधून होत आहे.
भूमिपुत्रांचे असेही सहकार्य..
चकदेव, शिंदी व वळवणला भेट देणाºया पर्यटकांना येथील स्थानिक ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य मिळते. परतीचा प्रवास करणाºया पर्यटकांना शिवसागर जलाशयातून लाँचने बामणोलीला यावे लागते.
यावेळी अंधार असल्यामुळे माहितीगार पर्यटकांना बामणोलीला सुखरूप घेऊन जातात. स्थानिक भूमिपुत्रांचा माणुसकीचा हा ओलावा आजही याठिकाणी पाहावयास मिळतो.