कांदाटी खोऱ्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चकदेव, पर्वतचा विकास साधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:29+5:302021-04-17T04:39:29+5:30
सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकास होणे आवश्यक ...
सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकास होणे आवश्यक आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून येथे विकास साधण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून याबाबत त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.
महाबळेश्वर तालुक्याच्या अतिदुर्गम कोयना-कांदाटी खोऱ्यात चकदेव व पर्वत ही शंकराची अतिप्राचीन मंदिरे आहेत. तसेच ही ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणूनही आकर्षित करत असतात. त्यामुळे येथे पर्यटक भेट देत असतात. येथे जाण्याासाठी अतिशय अरुंद वाट असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून येथे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात, अशी सूचना खा. पाटील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांना पत्राद्वारे केल्या आहेत. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्या अनुषंगाने वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आ. मकरंद पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन हा आराखडा अंतिम करण्यात यावा, अशी सूचनाही केली आहे. याशिवाय कांदाटी खोऱ्यात उचाट ते शिंदी या कोयना अभयारण्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे मंजुरीसाठी सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.