भाजप प्रदेश महिला मोर्चाचे साताऱ्यात चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:16 AM2021-02-28T05:16:21+5:302021-02-28T05:16:21+5:30
सातारा : टिक टॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन तिला ...
सातारा : टिक टॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन तिला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी भाजप प्रदेश महिला मोर्चाने शनिवारी दुपारी साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात चक्का जाम आंदोलन केले. दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची सरकार चौकशी करणार आहे का नाही? असा प्रश्न भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी उपस्थित केला.
सुवर्णा पाटील म्हणाल्या, पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला ११ दिवस उलटले तरी पोलिसांनी या घटनेबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला नाही. पूजा चव्हाण हिच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी साधी चौकशी केलेली नाही. पोलीस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. महिलांच्या प्रतिष्ठेबाबत सातत्याने बोलणारे पुरोगामी नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणार्या सरकारच्या काळात एका तरूणीच्या मृत्यूकडे इतक्या असंवेदनशील पद्धतीने पाहिले जात आहे, याची खंत वाटते.
पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत जे-जे पुरावे बाहेर आले आहेत, त्या सर्व पुराव्यांमधून या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध आहे, हेच दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा सुवर्णा पाटील यांनी दिला आहे.
यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष स्मिता निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, गणेश पालके, शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, निर्मला पाटील, हेमा भणगे, उत्तम गिरमे, जयदीप ठुसे उपस्थित होते.