दिसला चौक...टाक भाजी मंडई !

By admin | Published: June 12, 2015 10:21 PM2015-06-12T22:21:17+5:302015-06-13T00:28:27+5:30

नोकरदारांचा वेळ हेरून व्यवसाय : चौकाचौकांमध्ये भरू लागलीय भाजी मंडई

The Chaku ... Tala Bhaji Mandai! | दिसला चौक...टाक भाजी मंडई !

दिसला चौक...टाक भाजी मंडई !

Next

दत्ता यादव - सातारा--दिवसेंदिवस शहराचा विस्तार अगदी झपाट्याने वाढत आहे. पूर्वी एखादी छोटी वस्तू घ्यायची म्हटली तरी उपनगरातील नागरिकांना शहरात यावे लागत होते; परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या गरजा ओळखून अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय थाटले. त्यापैकीच एक म्हणजे रोजच्या जेवणातील भाजी होय. शहरातील चौकाचौकांमध्ये सध्या भाजी मंडई भरली असल्याचे दिसून येत आहे.
नोकरदारांचा वेळ आणि भाजी विक्रीतून होणारी उलाढाल मोठी असल्यामुळे सध्या भाजी विक्री व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. त्यामुळे अगदी शहराच्या उपनगरातही सकाळ आणि संध्याकाळ भाजी मंडईतील किलबील ऐकायला मिळत आहे. शहरामध्ये प्रामुख्याने तीन भाजी मंडई आहेत. रविवार पेठ, महात्मा फुले,आणि जुना मोटार स्टॅन्ड भाजी मंडईचा त्यामध्ये समावेश आहे. या मंडईमध्ये खरेदीसाठी विशेषत: रविवार आणि गुरुवारी गर्दी होते. त्यामुळे इतर दिवशी या मंडई अक्षरश: ओस पडतात. त्यामुळे केवळ दोनच दिवस व्यवसाय होत असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांनी शहर व उपनगरातील मुख्य चौकाचे ठिकाण हेरले. चौकाच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यात भाजी विक्रीस बसलो तर चांगला व्यवसाय होणार, हे माहीत असलेल्या विक्रेत्यांनी शहरातील असा कोणताच चौक सोडला नाही. मोळाचा ओढा, राधिका टॉकिज, बसस्थानक परिसर, समर्थ मंदिर, सीटी पोस्ट कार्यालय, पोवई नाका, गोडोली नाका, भूविकास बँक, जुना आरटीओ कार्यालय, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी सध्या भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे.
कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने भाजी विक्रीकडे पर्यायी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. शहरात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा उपनगरात मिळणाऱ्या भाज्यांचे दरही दुपटीने असतात. पंचवीस रुपये किलो दराने मिळणारे कांदे उपगनराच्या चौकातील भाजीमंडईत ३५ ते ४० रुपये किलोने विकले जात आहेत. उपगनरात राहणारा बहुतांशवेळा कामगार वर्ग असतो. सायंकाळी कामावरून आल्यानंतर शहरात जाण्यापेक्षा जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.


जागेवरून वादावादीचे प्रसंग
काही ठिकाणी चौकात भाजी विक्रीस बसण्यावरून अनेकदा विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. स्थानिक नगरसेवक किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरून चौकामध्ये जागा मिळविली जाते. एखादा नवखा विक्रेता त्या ठिकाणी आल्यास त्याला हुसकावून लावले जाते. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीला चौकामध्ये भाजी विक्रीस जागा मिळते.

शहारातील मंडईमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही. तेथे सगळी वशिलेबाजी आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शहराच्या बाहेरील चौकात भाजी विक्रीला बसावे लागत आहे. येथेही आम्ही जी काही पालिकेची रोजची पावती आहे, त्याची रक्कम भरतो. या ठिकाणी तरी आम्हाला सुखाने व्यवसाय करू द्या, अशी आमची अपेक्षा आहे.
- संपत गायकवाड (भाजी विक्रेता, मोळाचा ओढा)


वाहतुकीची कोंडी नित्याचीच
चौकाचौकांमध्ये भाजी मंडई भरू लागल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. काहीवेळेला छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मंडई विक्रीस धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांना बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. मात्र, ज्या त्या परिसरातील नागरिकांनी आपापल्या चौकातील सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: The Chaku ... Tala Bhaji Mandai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.