टंचाई निवारणाचे प्रशासनापुढे आव्हान
By Admin | Published: February 21, 2017 11:36 PM2017-02-21T23:36:35+5:302017-02-21T23:36:35+5:30
पाणीसाठे संपण्याच्या मार्गावर : आंधळी, पिंगळीत मृतसाठा; मासाळवाडी तलाव पूर्ण कोरडा, अखेरच्या टप्प्यात पावसाची हुलकावणी
दहिवडी : माण तालुक्यातील बहुतांशी पाणीसाठे आटण्याच्या मार्गावर आहेत. आंधळी धरण, पिंगळी, महाबळेश्वरवाडी, जाशी तलावात सध्या वापरण्यालायक नसलेला मृतसाठा शिल्लक आहे. मासाळवाडी तलाव पूर्ण कोरडा पडला आहे तर ब्रिटिशकालीन राणंद, लोधवडे, गंगोती तलावात वापरण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षी माण तालुक्यात सुरुवातीला पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. परिणामी तालुक्यातील पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरले गेले नाहीत. माणगंगा नदीवर आंधळी धरण असून, या धरणातही वापरण्यायोग्य नसलेला पाणीसाठा आहे. या धरणावर दहिवडी, गोंदवलेसह ११ गावांची जीवन प्राधिकरणची पाणी योजना आहे.
येथील पाणीसाठा संपुष्टात आल्यास या पाणी योजनेला मोठा फटका बसणार आहे. तसा सध्या धरणात मृत पाणी साठाच शिल्लक आहे.
पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्यामुळे लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणीटंचाई जाणवू नये तसेच माणगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता प्रशासनाने पुढाकार घेऊन उरमोडीचे पाणी माणगंगा नदीत सोडावे, अशी मागणी होत आहे.
उरमोडीचे पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने लक्ष घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो. उरमोडीचे पाणी सोडल्यास माणगंगा नदीवरील सिमेंट साखळी बंधारे व जुने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरल्यास माण तालुक्याच्या पूर्व भागाला टंचाई जाणवणार नाही. उरमोडीचे पाणी सोडल्यास जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पिंगळी तलावाचे काम ब्रिटीश कालखंडात झाले आहे. या तलावाला पाणलोट क्षेत्र अतिशय कमी आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला तरी हा तलाव नैसर्गिकरीत्या पूर्ण क्षमतेने भरत नाही. यासाठी माणगंगा
नदीतील पाण्याने हा तलाव भरला जातो. ही संकल्पना ब्रिटिशांची
होती.
बिदाल येथील तटवस्ती नजीक माणगंगा नदीवर तट टाकून पाणी अडवले जाते. हे पाणी अडवून कालव्याद्वारे सायफन व प्रवाही पद्धतीने दहिवडीमार्गे सोडून तलाव भरून घेतला जातो. मात्र, यावर्षी आंधळी धरण भरले नाही अन् नदीला पाणी वाहिले नसल्याने पाणी सोडले नाही. (प्रतिनिधी)