मनोमिलनापुढे महायुतीचे आव्हान !

By Admin | Published: October 22, 2016 11:49 PM2016-10-22T23:49:30+5:302016-10-23T00:52:57+5:30

सातारा पालिका : भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत मनसेदेखील--पालिका धुमशान

Challenge of Mahayuti challenge ahead! | मनोमिलनापुढे महायुतीचे आव्हान !

मनोमिलनापुढे महायुतीचे आव्हान !

googlenewsNext


मनोमिलनापुढे महायुतीचे आव्हान !
सातारा पालिका : भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत मनसेदेखील--पालिका धुमशान
सातारा : साताऱ्यातील मनोमिलनाच्या सत्तेला हादरा देण्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, स्वाभिमानी यांच्या महायुतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सोबत घेतले आहे. सध्याच्या घडीला ‘जम्बो’ महायुतीतील जागा वाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात असून, सर्वधर्मीय व बहुपक्षीय महायुतीचे मनोमिलनापुढे आव्हान उभे ठाकले आहे.
सातारा शहराची सत्ता ताब्यात असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडी या दोन आघाड्यांचे या निवडणुकीतही मनोमिलन कायम टिकणार की त्यात काडीमोड होणार? याबाबत निश्चित धोरण ठरले नसले तरीही सत्ताधाऱ्यांविरोधात नवख्या उमेदवारांचे सक्षम पॅनेल उभे करण्याच्या घडामोडी घडल्या आहेत.
केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता आहे, या सत्तेत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसली तरी साताऱ्यात मात्र भाजप नेत्यांनी एक पाऊल पुढे टाकत जम्बो महायुतीचा प्रयोग राबविला आहे. जागा वाटपाचा कच्चा आराखडा तयार झाला असला तरी महायुतीच्या एकत्रित बैठकीनंतरच ‘फायनल’ धोरण ठरले जाणार आहे. सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप २५ जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी संख्या असल्याचा दावा भाजपमधील सूत्रांकडून केला जात आहे. भाजपमध्ये रीतसर प्रवेश मगच उमेदवारी, अशी अट भाजपतर्फे घालण्यात आली आहे. या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी धनवंती पवार, नगरसेविका सुवर्णा पाटील, सिद्धी पवार यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच शहराध्यक्ष सुनील काळेकर, धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, संजय लेवे, अप्पा कोरे, विठ्ठल बलशेटवार, महेश गोळे, अप्पा पानसकर, महेंद्र कदम आदींची नावे चर्चेत आहेत. ही यादी आणखी वाढणार आहे.
शिवसेनेला फुटका तलाव परिसरात तसेच शाहू चौक, शुक्रवार पेठ, सोमवार पेठेत संधी दिली जाणार आहे. जाग वाटपात शिवसेनेच्या पारड्यात ६ जागा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरपीआयला सदर बझार, मल्हारपेठ येथील आरक्षित चार जागांवर संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करंजे, सदर बझार परिसरात संधी दिली जाऊ शकते. मनसेला दोन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला बोगदा परिसरात दोन जागा दिल्या जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार साविआचे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर यांच्याविरोधात दंड थोपटणार आहे.
शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. शिरीष दिवाकर यांची लढत नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्याशी होण्याची शक्यता आहे. फुटका तलाव परिसरातून शिवसेनेचे शहराध्यक्ष किशोर पंडित किंवा त्यांच्या पत्नी नगरसेविका आशा पंडित यांची उमेदवार निश्चित होणार आहे. शाहू चौकात श्रीनिवास जाधव यांना संधी दिली जाणार आहे. सोमवार पेठेत शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. (प्रतिनिधी)


चलो बुलावा आया है..
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने आपल्याकडे खेचल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून नगरसेवक पदावर संधी मिळाली असल्याने आता पक्षातून नाही तर आमच्या आघाडीतून निवडणूक लढा, असा सल्ला अनेकांना दिला गेला असल्याने त्यांची दोलायमान परिस्थिती आहे.

निवडणुकीसाठी तरुणाईची सोशलगिरीसातारा : नगरपालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत चित्रफितीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा फंडा काही नगरसेवकांनी अवलंबला होता. यंदा मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांशी रोजच्या रोज संवाद साधण्याचा प्रयत्न पालिका निवडणुकीतील हवसे-गवसे करू लागले आहेत. त्यामुळे मतदारांना रोज त्यांच्याकडून अभिवादन व शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण सुरू झाली आहे.
मनोमिलन होणार का स्वतंत्र लढणार, आपल्याला तिकीट मिळणार का गाशा गुंडाळावा लागणार, मराठा क्रांतीमुळे उदयास आलेल्या नेतृत्वाला नेते शमवणार का नाचवणार याचा कसलाही अंदाज अद्यापही न आलेल्या काही इच्छुकांनी आपल्या घरातील तरुणाईला हाताशी घेऊन रोजच्या रोज सुप्रभात आणि शुभरात्रीच्या मेसेजची खैरात मांडली आहे. ब्रॉडकास्ट करण्यात येत असलेल्या या मेसेजमुळे एकावेळी एक पोस्ट तब्बल अडीचशे जणांना सहज मिळत आहे. त्यामुळे कमी वेळात जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमातून झाला असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आचारसंहिता आणि सोशल मीडियाचा वापर याचा सारासार अभ्यास करून वकिलांशी सल्लामसलत करणाऱ्यांचीही
संख्या यंदा मोठी आहे. त्यामुळे खात्रीशीर तिकीट मिळविणाऱ्या उमेदवारांनी नागरिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणुकींना अजून महिन्याभराचा अवकाश असला तरीही मतदारांपर्यंत आपणच आधी पोहोचण्याची लगबग प्रत्येकाकडून होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Challenge of Mahayuti challenge ahead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.