अध्यक्षपदासाठी फलटणकरांना कऱ्हाडकरांचे आव्हान!
By admin | Published: March 16, 2017 11:32 PM2017-03-16T23:32:11+5:302017-03-16T23:32:11+5:30
जिल्हा परिषद : संजीवराजे निश्चित पण मानसिंगराव जगदाळेही दावेदार; सव्वा वर्षासाठी पद ठेवावे का यावर खल..
.
नितीन काळेल ल्ल सातारा
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड जवळ येत आहे तसतसे इच्छुक समोर येऊ लागले आहेत. अध्यक्षपदासाठी संजीवराजेंचे नाव निश्चित होत असतानाच आता कऱ्हाड उत्तरमधील मानसिंगराव जगदाळेंचे नाव पुढे आले आहे. तसे संकेतही तेथील आमदारांनी दिले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वसंतराव मानकुमरेंचे नाव मागे पडत असतानाच आता जगदाळेंच्या रुपाने फलटणकरांपुढे अध्यक्षपदाचे आव्हान उभे राहणार आहे. शेवटी जिल्हा पातळीवर निर्णय न झाल्यास बारामतीकरच या लाल दिव्याचा निर्णय घेणार हे स्पष्ट आहे. दुसरीकडे अध्यक्षपद सव्वा वर्षासाठी ठेवावे का यावरही पक्षांतर्गत खल सुरू झाला आहे.
दरम्यान, कोरेगाव, पाटण, सातारा मतदार संघात उपाध्यक्षपद व सभापतिपदे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत असून, मानसिंगराव जगदाळे यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिली तर उपाध्यक्ष किंवा सभापतिपदावर समाधान मानावे लागणार आहे. सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद ठरल्यास जगदाळेंना संधी मिळू शकते.
सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक अशा ३९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ६४ सदस्य संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचेच बहुमत झाले आहे. त्या तुलनेत काँग्रेस दुबळी ठरली आहे. दुसरीकडे भाजपनेही अनेक ठिकाणी कमळ फुलविले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचीच सत्ता येणार हे स्पष्ट आहे.
यावेळी पहिल्या अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेचे आरक्षण आहे. त्यामुळे निकाल लागल्यापासून फलटण तालुक्यातील संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव पुढे येत होते. त्याबरोबरीनेच जावळी तालुक्यातील वसंतराव मानकुमरे यांचे नावही अध्यक्षपदाच्या चर्चेत होते. पण, सध्या मानकुमरेंचे नाव मागे पडले आहे. आता संजीवराजेंच्याबरोबरीने कऱ्हाड उत्तर मतदार संघातील मानसिंगराव जगदाळे यांचे नाव पुढे आले आहे. कारण, कऱ्हाड उत्तरच्या आमदारांनीही यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कऱ्हाड उत्तरचा दावा राहणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत रंग भरले जाणार आहेत. त्याचबरोबर मागील पंचवार्षिकमध्ये मानसिंगराव जगदाळे यांच्या पत्नी सदस्या होत्या. त्यावेळी प्रथम अडीच वर्षांसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी होते. वाई तालुक्यातील अरुणादेवी पिसाळ या अध्यक्षा झाल्या. त्यावेळी उर्वरित सव्वा वर्षासाठी विजयमाला जगदाळेंना अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. पण, तसे झाले नाही. त्यानंतरच्या पुढील अडीच वर्षांच्या काळातही जगदाळे यांना सभापतिपदही मिळू शकले नाही. त्यामुळे आता अध्यक्षपद कऱ्हाड उत्तरलाच मिळायला पाहिजे, असा दावा सुरू झाला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या या शर्यतीत फलटणकर की कऱ्हाडकर बाजी मारणार हे लवकरच समजणार आहे.
अध्यक्षपदासाठी संजीवराजेंचे नाव निश्चित असून, उपाध्यक्षपदी मानसिंगराव जगदाळे यांची वर्णी लागू शकते. तसेच सातारा मतदार संघातील वसंतराव मानकुमरेंनाही उपाध्यक्ष किंवा पुन्हा सभापतिपद मिळू शकते. अन्यथा सातारा मतदार संघातील प्रा. शिवाजीराव चव्हाण यांच्याकडेही सभापती जाऊ शकते. कोरेगाव मतदार संघातून प्रदीप विधाते व जयवंत भोसले यांची नावे सभापतिपदासाठी पुढे आली आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरच दोघांपैकी एकाचे नाव निश्चित होणार आहे. पाटण तालुक्यातून राजेश पवार किंवा संगीता खबाले-पाटील यापैकी एकाची वर्णी सभापतिपदी निश्चित स्वरुपात राहणार आहे. तरीही विक्रमसिंह पाटणकर यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. माण मतदार संघातील व दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही स्नुषा सदस्या आहेत. यापैकी एकाची महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती निवड होऊ शकते. वाई मतदार संघातील खंडाळा तालुक्यात एखादे सभापती पद जाऊ शकते. अन्यथा आमदार मकरंद पाटील यांच्याकडून पुढील अडीच वर्षांतील गणिते आताच आखली जाऊ शकतात.