चमको नगरसेवकांच्या विळख्यात सातारा!
By admin | Published: October 30, 2014 12:38 AM2014-10-30T00:38:40+5:302014-10-30T00:38:40+5:30
बसथांब्यांवर फुकटची जाहिरात : पैसा जनतेचा; रुबाब मात्र ‘मेहरबान’चा
सातारा : जनतेच्या पैशांतून बांधलेल्या बसथांब्यांवर दिमाखात स्वत:चा फोटो चमकविण्याचा प्रघात काही आजी-माजी चमको नगरसेवकांनी पाडलाय. काही जण माजी झाले तरी ‘मा. नगरसेवक’ असा उल्लेख करून या बसथांब्यांवर फुक्कटची जाहिरातबाजी करण्यात फुशारकी मारत आहेत.
जनतेच्या पैशांतून अथवा खासगी विकसकाच्या माध्यमातून बसथांब्यांचे सुशोभीकरण करायचे आणि बसथांबा तयार होताच ‘अमुक-तमुक नगरसेवकाच्या निधीतून’ असा उल्लेख त्यावर करायचा, असा प्रकार सर्रास सुरू आहे. शहरात कुठेही जाहिरात फलक लावायचा झाल्यास पालिकेकडे कर जमा करावा लागतो. मात्र, बसस्थानकांवरील अशा जाहिरातींना कुठलाही कर नसल्याने जाहिरातबाजी केली जाते. ती वर्षानुवर्षे तशीच राहते. कलर गेला अथवा फ्लेक्स ऊन-वाऱ्याने फाटला तर मेहरबान मंडळी त्याची डागडुजी करतात; पण आपली ‘तारीफ’ कमी होऊ देत नाहीत. सातारचे नाक असणाऱ्या पोवई नाका परिसरातील रयत शिक्षण संस्थेजवळ एका माजी पदाधिकाऱ्याने अनेक वर्षांपासून बसथांब्यावरील जाहिरातीची जागा अडवून ठेवली होती.
शहरात सुमारे सहा बसथांबे आहेत. यापैकी राजपथावरील बसथांब्याचे कूपर उद्योग समूहातर्फे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, कूपर कंपनीने आपली जाहिरात करणे टाळले. मात्र, जनतेच्या पैशांवर बसथांबे बांधून, त्यावर जाहिराती करण्याचा प्रकार काही केल्या थांबत नाही. हे बसथांब्यांवर खासगी उद्योगांच्या जाहिराती केल्यास पालिकेला जाहिरात कराच्या रूपाने उत्पन्न मिळू शकते. (प्रतिनिधी)