पाटणच्या चंबूंला शिवसेनेमुळे मिळालं मंत्रिपद : संजय राऊत
By नितीन काळेल | Published: March 3, 2023 11:50 PM2023-03-03T23:50:13+5:302023-03-03T23:50:43+5:30
सातारा येथील शाहू कला मंदिरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते.
सातारा : ‘अजिंक्यतारा किल्ल्याने परकीयांचे वार झेलले तसेच शिवसेनेनेही ५५ वर्षांत वार अंगावर घेतले. सेनेतच आता ४० गद्दार निघाले. पाटणचे पापाचं पितर शंभू का चंबू यांना शिवसेना नसती तर मंत्रिपदही मिळाले नसते. ३७ वर्षांनंतर त्यांच्या घराण्यात मंत्रिपद आले,’ असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. सातारा येथील शाहू कला मंदिरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षल कदम आदी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार राऊत म्हणाले, ‘दोन दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात शिवगर्जना मेळावे झाले. यामध्ये पक्ष गेला, चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना चपराक मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक येऊन भेटले. त्यांनी गद्दारांच्या नावाने बोंबा मारल्या, तर निवडणूक आयोगाने गद्दारांच्या बाजूने निकाल दिला. कोणी म्हणते आयोगाला शिवी दिली. पण, ज्याची लायकी जशी, तशीच भाषा वापरावी लागते. त्यातच आता ५० खोके एकदम ओके ही देशात लोकप्रिय शिवी झालेली आहे.
महाराष्ट्र गद्दारांची बेईमानी विसरणार नाही. त्यांच्या कपाळी इतिहास लिहिला आहे, असे सांगून खासदार राऊत पुढे म्हणाले, ‘मोदी आणि शाहांनी महाराष्ट्राला ओळखले नाही. आम्ही मरू पण, वाकणार नाही. आता तर निवडणूक आयोग बेकायदा ठरवलाय. २०२४ मध्ये ज्यांनी निर्णय दिलाय, त्यांना चुना लावू. कारण, कागदावर आमचे चिन्ह गेले असलेतरी ठाकरे ब्रॅंड आमच्याकडे आहे.
मार्गदर्शन अन् टीकास्त्र...
- मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी पडले. त्यावेळी पंत आणि मिंद्यांनी कट रचला. याचा आपण सूड घेऊया.
- भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत पलटी मारली. २०२४ मध्ये सूड घेऊन सेनेचा मुख्यमंत्री करू.
- आमचे सरकार पाडण्यासाठी २ हजार कोटी दिले.
छत्रपतींच्या वंशजांची तडजोड...
खासदार राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भाजपशी तडजोड केली. भाजपला कधीच शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही, असेही ते म्हणाले.
खंजीर खुपसला तर कोथळा काढू...
शिवसेना चक्रव्यूहात सापडली, असे वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. कारण, शिवसेनेने ५० वर्षांत अनेक वार झेलले आहेत. समोरून वार केला तर आम्ही करू. पण, जर कोणी पाठीमागून पाठीत खंजीर खुपसत असेल तर मागे वळून त्यांचा कोथळा बाहेर काढू, असा इशाराही राऊत यांनी दिला.