चंद्रकांत लोखंडेच्या टोळीला मोक्का, सातारा पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झाल्याप्रकरणीही गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:28 PM2017-12-12T18:28:06+5:302017-12-12T18:32:14+5:30
राज्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, अत्याचार असे गुन्हे नोंद असणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काच्या प्रस्तावास मंजुरीही दिली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चंद्रकांत लोखंडे पळून गेला होता. याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.
सातारा: राज्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, अत्याचार असे गुन्हे नोंद असणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काच्या प्रस्तावास मंजुरीही दिली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चंद्रकांत लोखंडे पळून गेला होता. याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २७ एप्रिल २०१७ रोजी शिरवळमध्ये महिलेच्या गळ्यातून दागिने हिसकावण्याची घटना घडली होती. शिरवळच्या केदारेश्वर मंदिराजवळ दुचाकीवरून अनोळखी तिघेजण आले होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अनोळखीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातून सोन्याचे गंठण हिसकावून नेले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व पथकाने उघडकीस आणला होता. या गुन्ह्यात चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (मूळ रा. ढवळ, ता. फलटण. सध्या रा. शिरवळ), नीलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव, ता. फलटण) आणि अक्षय शिवाजी खताळ (रा. बिबी, ता. फलटण) हे आरोपी निष्पन्न झाले होते. यातील निकाळजे हा गुरांचा डॉक्टर आहे.
तपासादरम्यान या टोळीच्या विरोधात शिरवळ, लोणंद, फलटण ग्रामीण, खंडाळा, सातारा शहर, सातारा तालुका तसेच मुंबईतील कळंबोली, पनवेल पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी, अत्याचार, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली होती.
विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याने व दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शिरवळचे पोलिस निरीक्षक बी. एन. पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्याकडे पाठवला होता.
हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फलटणचे पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे हे करणार आहेत.