शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे

By नितीन काळेल | Published: April 27, 2024 10:13 PM2024-04-27T22:13:54+5:302024-04-27T22:16:54+5:30

बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे; भ्रष्टाचार मान्य आहे का?

chandrashekhar bawankule criticize sharad pawar in satara | शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती आहे. त्यांना बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शून्य होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो शरद पवार यांना मान्य आहे का ? असा सवाल केला. 

सातारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.  विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, आदी उपस्थित होते. 

बावनकुळे म्हणाले, देशातील इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा एकही उमेदवार नाही. या उलट दरवर्षाला पंतप्रधान बदलायचा, असा ते विचार करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानपदापर्यंत जाण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण, ते जमले नाही. त्यांचे नाव पंतप्रधान मोदींबरोबर कशासाठी जोडले जाते, हेच कळत नाही. 

महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक केली तर महाराष्ट्रात संघर्ष करू, असा इशारा शरद पवार यांनी दिल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे यांनी, त्यांनी संषर्घ केला तरी जनता हे मान्य करणार नाही. कारण, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पवार यांना मान्य आहे का ?, पवार यांनी त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रमाणपत्र दिले आहे का? असा सवाल केला; तर शरद पवार यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते रशियाचे पुतीन अशी टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे यांनी ‘कुठे मोदी आणि कुठे पवार ? त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे,’ अशी टीका केली.

४ जूनला कळेल ताकद

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दहिवडीतील सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात ३२ ते ३५ उमेदवार जिंकतील, असा दावा केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०१९ प्रमाणेच सुप्त लाट आहे. ही त्सुनामीसारखी आहे. त्यामुळे ४ जूनलाच त्यांना समजेल काय ते, असे स्पष्ट केले.
 

Web Title: chandrashekhar bawankule criticize sharad pawar in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.