जातींच्या हजारो तुकड्यांची मोट बांधण्यासाठी परिवर्तन यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:27 AM2018-05-31T00:27:42+5:302018-05-31T00:27:42+5:30
‘तोडा, फोडा आणि राज्य करा या नितीने देशभरातील बहुजन मूलनिवासी हे हजारो जातींच्या तुकड्यात वाटले गेले आहेत.
सातारा : ‘तोडा, फोडा आणि राज्य करा या नितीने देशभरातील बहुजन मूलनिवासी हे हजारो जातींच्या तुकड्यात वाटले गेले आहेत. तुकड्या तुकड्याने असलेल्या या जातींना एकत्रित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा ही कल्पना साकारत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, ३६७ तालुके व ४४ हजार गावांत परिवर्तन यात्रा सुरू आहे.
विकासापासून वंचित राहिलेल्या हजारो जातींना तुकड्यात वाटून त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. तो दूर करण्यासाठी ही परिवर्तन यात्रा आता देशभरातील ३१ राज्यांत ५५० जिल्ह्यांत व १ लाख ५० हजार गावांमध्ये जाणार आहे, अशी ही पहिलीच परिवर्तन यात्रा आहे,’ असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले.
बहुजन क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेचे सातारा येथे आगमन झाले. त्यानंतर गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष भालचंद्र माळी, क्रांती थिएटरचे अध्यक्ष अमर गायकवाड, चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश रावखंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र्र कांबळे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या संध्या शिर्के , घिसाडी समाजाचे नेते मुरलीधर पवार, आरपीआय ब्ल्यू फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे आयूब मुल्ला, अमोल बनसोडे उपस्थित होते.
वामन मेश्राम म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचे वर्तन संशयास्पद असेच होते, दंगलीचा कट करणाऱ्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना त्यांनी क्लीनचिट दिले. त्यांनी चौकशीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहणे आवश्यक होते. मात्र, त्या दंगलीला चितावणी देणाºयांना वाचविण्याची भूमिका जगजाहीर झालेली आहे. न्यायालयात आता पुरावे सादर करण्याचे काम सुरू असून, जनतेतून खासगी चौकशी सुरू आहे.
सगळे ठोस पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात कायद्याच्या विरोधी आचरण केल्याप्रकरणी केसेस दाखल करणार आहोत. प्रस्थापितांकडून सुरू असलेल्या अन्याय, अत्याचारात देशभरातील हजारो जातींच्या तुकड्यात वाटलेली जनता भरडून निघत आहे.’ जिल्ह्यातील विविध जातींच्या २५० संघटनांनी पाठिंबाही मिळाला.