होमगार्डकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:17 AM2020-04-27T10:17:01+5:302020-04-27T10:17:27+5:30
कोरोनाविरोधातील लढा हा सर्वांनाच अतिशय काळजीनं अन् घरात राहूनच लढावा लागणार आहे. लोकांनी घरात बसून राहणं महत्त्वाचं आहे. प्रशासनाच्या सूचनांचं प्रत्येक नागरिकांना यथोचित पालन केलं तर कोरोनाशी लढा यशस्वी होऊ शकतो. - प्रमोद पाटील, केंद्र नायक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड, सातारा
दत्ता यादव ।
सातारा : कोरोना महामारीविरोधातील युद्धात प्रशासनाचे कसब पणाला लागलेले आहे. अनेक अडचणी येतायत, त्यातच पोलीस अन् होमगार्डवर हल्ले होतायत. जे पोलिसाला अधिकार आहेत, तेच अधिकार होमगार्डस्ना पण आहेत. त्यामुळे होगगार्डकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन होमगार्ड आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. जिल्ह्यात सध्या ४९५ होमागार्ड तैनात असून, त्यांच्या सुरक्षिततेची कशाप्रकारे काळजी घेतलीय यासंदर्भात जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील केंद्र नायक प्रमोद पाटील यांच्याशी केलेली बातचित...
ा्रश्न : होमगार्डची सध्या नेमकी कशी काळजी घेतली गेलीय?
उत्तर : पूर्वी होमगार्डला जिल्ह्यात कुठेही ड्यूटी दिली जात होती. मात्र, कोरोनामुळे यात बदल करण्यात आलाय. ज्या ठिकाणी होमगार्ड राहत आहे. त्याच ठिकाणी त्याला ड्यूटी दिली गेली आहे. जेणेकरून त्याचा प्रवास वाचेल. हॅन्ड सॅनिटायझर, मास्क अशा प्रकारची सुरक्षिततेची साधनेही त्यांना देण्यात आली आहेत. घरात गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत होमगार्डस्सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहेत.
प्रश्न : या परिस्थितीत लोकांना काय आवाहन कराल?
उत्तर : आपली सर्व गावे निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. बंदोबस्तावर असताना लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला जात आहे. हे काम आयुष्यभर आठवणीत राहणारे असेच आहे. सर्व लोकांनी पोलीस आणि होमगार्डस् सहकार्य करावे. हे योद्धे आपल्या आरोग्यासाठी खूप काळजी घेत आहेत.
प्रश्न : किती होमगार्ड सध्या तैनात आहेत?
उत्तर : सध्या १४४३ होमगार्ड आहेत. यापैकी ५०० होमगार्डची मागणी झालीय; पण सध्या ४९५ कार्यरत आहेत. प्रशासनाच्यावतीने मागणी केल्यास आणखी उपलब्ध होतील.
चारजणांवर भार..
जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या एक अधिकारी आणि तीन कर्मचारी आहेत. या केवळ चार कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जिल्ह्याचा भार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यात होमगार्ड काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कार्यालयीन कामावर परिणाम होत आहे. या कार्यालयासाठी १७ जागा रिक्त आहेत. मात्र, अद्याप या जागा भरल्या गेल्या नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
मदतीचा ओघ वाढतोय
होमगार्डना काय अधिकार आहेत, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे हा काय होमगार्ड करणार, असे समजून अनेकजण होमगार्डस् अपमानास्पद आणि पोलिसांपेक्षा वेगळी वागणूक देतायत. मात्र, ज्यावेळी होमगार्डपण कायद्याने चालतो. तेव्हा मग लोक गयावया करतात. होमगार्डच्या पदावर जाऊ नका, हा होमगार्डही तुमच्या सेवेसाठीच रस्त्यावर अहोरात्र लढत आहे. ते सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असतात. त्यांना मदत करा, असेही पाटील यांनी आवाहन केले आहे.
संडे स्पेशल मुलाखत