महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीत बदल, आजपासून होणार अंमलबजावणी
By दीपक शिंदे | Updated: June 7, 2023 14:45 IST2023-06-07T14:44:56+5:302023-06-07T14:45:24+5:30
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांसाठी वाहतुकीत तात्पुरता बदल

महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीत बदल, आजपासून होणार अंमलबजावणी
सातारा: देशातून तसेच परदेशातून लाखो पर्यटक महाबळेश्वरला पर्यटनाला येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुधवार, दि. ७ ते २५ जून या कालावधीत प्रायोगिक तत्वावर दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
महाबळेश्वर, पाचगणी ही जागतिक दर्जाची थंड हवेची पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी राज्यातून तसेच देशातून लाखो पर्यटक पर्यटनासाठी भेट देत असतात. तसेच पर्यटनासाठी येणारी विदेशी पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी काही दिवसांसाठी हा वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
नवा वाहतुकीचा बदल पुढीलप्रमाणे: मुंबई-पुणे बाजूकडून महाबळेश्वरसाठी येणारी वाहनांची वाहतूक सुरूर फाटा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर (एकूण ४८ किमी) ला जाईल. तसेच पाचगणी बाजूकडून पुणे-मुंबईकडे जाण्यासाठी पाचगणी-वाई, सुरूर फाटा या मार्गाचा वापर पर्यटकांना करता येणार नाही. त्यासाठी पाचगणी-संजीवन विद्यालय, पाचगणी, रुईघर महू डॅम रस्त्याने करहर-कोळेवाडी, कुडाळ, पाचवड फाटा मार्गे पुणे या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
महाबळेश्वर बाजूकडून पुणे-मुंबईसाठी जाणारी वाहतूक महाबळेश्वर वरून मेढा-कुडाळ, पाचवड फाटा मार्गे पुणे बाजूकडे जाईल. किंवा महाबळेश्वर-मेढा, सातारा पुणे अशी पुणे-मुंबईकडे जाईल. याबाबत काही हरकती असल्यास disttraffic.satara@mahapolice.gov.in या ईमेल आयडीवर पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यानंतर अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.
अन्यथा मोठा वळसा घ्यावा लागेल...
महाबळेश्वर बाजूकडून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक पाचगणी मार्गे जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना लिंगमळा-भेकवली मार्गे महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील लिंगमळा फाटा-मेढा कुडाळ, पाचवड फाटा मार्गे पुणे बाजूकडे वळविली जाईल. त्यामुळे ज्या रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याच रस्त्याने पर्यटकांनी आपला प्रवास करावा, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.