शेतकऱ्यांकडून पारंपरिक शेती व्यवसायात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:04+5:302021-05-24T04:38:04+5:30
मायणी : ग्रामीण भागातील शेतकरी आता पारंपरिक शेती व्यवसायाला बगल देऊन व्यापारी पिके घेण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत आहेत. ...
मायणी : ग्रामीण भागातील शेतकरी आता पारंपरिक शेती व्यवसायाला बगल देऊन व्यापारी पिके घेण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनचा वापर करू लागले आहेत. लाॅकडाऊन असूनही पेरणी व लागवडी पूर्व कामास वेग आला आहे.
ग्रामीण भागामध्ये खरीप हंगाम व रब्बी हंगाम अशा दोन हंगामातच पारंपरिक शेती व्यवसाय गेल्या कित्येक वर्षापासून केला जात आहे. वडिलोपार्जित शेतजमीन असल्याने घरातील वडीलधारी मंडळीच बऱ्यापैकी शेतीत लक्ष घालत होती व येणारे उत्पन्नामध्ये वर्षभराचा अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लावत होते. मात्र गेल्या वर्षापासून ग्रामीण भागातील शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला आहे. युवा पिढी शेती व्यवसायात लक्ष घालू लागल्याने पारंपरिक शेतीबरोबरच व्यापारी पिकांनाही प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मान्सून आगमनापूर्वी शेतीतील मशागत व पेरणीपूर्व कामे करण्याची पद्धत गेल्या कित्येक वर्षापासून आहे. येणारा हंगाम हा खरिपाचा हंगाम असतो. त्या हंगामामध्ये शेतकरी व्यापारी पिकांना प्राधान्य देत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने घेवडा, मूग, उडीद, मका, चवळी, मटकी, तूर आदी पिके शेतकरी वर्गाकडून पारंपरिक शेती करून घेतली जात आहेत. मात्र आता या क्षेत्रात युवा पिढी आल्यामुळे या खरीप हंगामातील पिकांबरोबर इतरही कमी पाण्यात व कोरडवाहू क्षेत्रांमध्ये येणारी व्यापारी व अधिक उत्पन्न देणारी पिके व फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
(चौकट)
ग्रामीण भागात पारंपरिक शेतीबरोबरच सध्या परिसरामध्ये द्राक्ष, पेरू, सीताफळ, हापूस व केशर आंबा, केळी आदी बागांची लागवड केली जात आहे. आले, बटाटा, शेवगा, मोठी मिरची, फ्लॉवर, कोबी व पिके घेण्यास सुरुवात झाली आहे.
कोट..
कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. सुरुवातीला हे सिंचन करण्यासाठी थोडेफार आर्थिक भांडवल लागते. मात्र शासनाकडूनही जवळजवळ पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे. खर्च होत असला तरी कमी पाण्यावर अधिक क्षेत्र ओलिताखाली आणून अधिक उत्पादन घेता येत आहे.
-संजय क्षीरसागर, युवा व प्रयोगशील शेतकरी, मायणी
२३ठिबक
मायणी
ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग ठिबक व तुषार सिंचनाला प्राधान्य देत आहेत. (छाया : संदीप कुंभार)