शिक्षण संस्थांत अनागोंदी कारभार! : फलटणमधील शाळांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:06 AM2019-09-26T00:06:30+5:302019-09-26T00:07:13+5:30

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये फलटण तालुक्यातील माध्यमिक शाळांना अचानक ...

 Chaos in education institutes! : Visits to schools in Phaltan | शिक्षण संस्थांत अनागोंदी कारभार! : फलटणमधील शाळांना भेटी

फलटण तालुक्यातील गोखळी शाळेला सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली.

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवाची नोटीस

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये फलटण तालुक्यातील माध्यमिक शाळांना अचानक भेटी देत तेथील कामकाजाची व कागदपत्रांची पडताळणी केली. यावेळी काही शैक्षणिक संस्थांमध्ये अनागोंदी कारभार आढळला असून, संबंधितांना त्यांनी करणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर पुढील कार्यवाहीच्या सूचनाही क्षीरसागर यांनी संबंधित मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

दरम्यान, या आकस्मित पाहणीमुळे खासगी शैक्षणिक संस्थांमधील अनागोंदी कारभार यानिमित्ताने समोर आला असून, संबंधित विभागाने तालुक्यातील संस्थांची कसून पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये फलटण तालुक्यातील हनुमान विद्यालय गोखळी, ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी, सर लष्कर बाबाराजे खर्डेकर विद्यालय हनुमंतवाडी, जितोबा विद्यालय जिंती, जयभवानी हायस्कूल खुंटे आदी शाळांना आकस्मित भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील जनरल रजिस्टर, शिक्षक हजेरी पत्रक, विद्यार्थी हजेरी पत्रक, ग्रंथालय, ग्रंथालय पुस्तक देव-घेव रजिस्टर, शालेय पोषण आहार नोंदवही, चव रजिस्टर, प्रयोगशाळा नोंदवही आदी अभिलेखांची तपासणी केली.

मागील वर्षी एप्रिल व शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शाळांनी ८० प्रकारचे अभिलेख अद्ययावत ठेवावेत, याबाबत पत्राद्वारे व मुख्याध्यापक सभेत शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांनी सूचना दिल्या होत्या. परंतु तरीही यामध्ये अपूर्णता असल्याचे त्यांना आढळून आले. खुंटे येथील शाळेत एक शिपाई गेल्या तीन तारखेपासून गैरहजर असून, हजेरीपत्रकावर त्यांच्या स्वाक्षºया नाहीत, त्यांचा रजेचा अर्जही नाही. याच शाळेतील नववीच्या शिक्षकाने चालू महिन्यामध्ये एकही दिवस हजेरी घेतली नसल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे संबंधितांस कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य शाळांना दिलेल्या भेटीमध्ये ग्रंथालय व प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोल्या नसणे.

शालेय पोषण आहाराच्या नोंदी दररोज पूर्ण न करणे, विद्यार्थी हजेरी पत्रकात हजर-गैरहजर, गोषवारा दररोज न लिहिणे, शिक्षक हजेरी पत्रकात रजांचा हिशोब न लिहिणे, शालेय पोषण आहार नोंदवहीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या स्वाक्षºया नसणे, स्वच्छतागृहांची अपुरी संख्या, जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांचे स्टुडंट आयडी व यूआयडी नंबर यांच्या नोंदी पूर्ण नसणे अशा व अन्य त्रुटीही आढळून आल्या. त्याबाबत संबंधित शाळांच्या शेरे पुस्तकात शेरे नमूद करून या प्रकाराबाबत खुलासा करण्याचे निर्देश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिले आहेत.

दरम्यान, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी अचानकपणे भेटी दिल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेला कारभार उजेडात आला आहे. यानिमित्ताने कामचुकार कर्मचारी, शिक्षक यांना काही प्रमाणात का होईना धास्ती बसली आहे. भविष्यात अशाच प्रकारे भेटी देऊन केवळ कारणे दाखवा नोटिसी न देता दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

 

शाळा तपासणी व भेटींचे नियोजन उपशिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. अनियमितता असणाºया शाळा, कर्मचाºयांच्यावर महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती अधिनियम १९७७ नियमावली १९८१ नुसार कारवाईचे संस्थांना निर्देश दिले आहे.
- राजेश क्षीरसागर, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
 

Web Title:  Chaos in education institutes! : Visits to schools in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.