चाफळ पोलीस बंधूंना कोणी घर देता का घर..?, खासगी पडवीचा घ्यावा लागतोय आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 05:28 PM2022-08-08T17:28:54+5:302022-08-08T17:29:18+5:30
तालुक्याला शंभूराज देसाईंच्या रूपाने गृह राज्यमंत्रिपद मिळूनही कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आसरा मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका मानली जात आहे
हणमंत यादव
चाफळ : चाफळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांची अवस्था ‘न घर का, ना घाट का’ अशी काहीशी होऊन बसली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांना श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या भक्त निवासस्थानाचा आसरा घ्यावा लागत आहे. तालुक्याला शंभूराज देसाईंच्या रूपाने गृह राज्यमंत्रिपद मिळूनही कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आसरा मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका मानली जात आहे. शासनाने येथील कर्मचाऱ्यांना सुसज्ज निवासस्थान बांधण्यासाठी निधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चाफळ विभागात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चाफळला साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी पोलीस आऊट पोस्टची मंजुरी देत एका पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक शासनाने येथे केली होती. हे आऊट पोस्ट येथील एका दानशूर व्यक्तीच्या दात्रृत्वातून खासगी घरामध्ये सुरू करण्यात आले होते. त्यानंतर चाफळला पोलीस दूरक्षेत्राचा दर्जा मिळाला व दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कालांतराने यात फक्त एका कर्मचाऱ्याची वाढ होऊन सध्या तीन कर्मचारी येथील कार्यभार सांभळत आहेत. त्यांचीही अवस्था ‘न घर का, ना घाट का’ अशी काहीशी होऊन बसली आहे.
राहण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांना श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या भक्त निवासस्थानाचा आसरा घ्यावा लागत आहे. चाफळला पोलीस दूरक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर स्वतंत्र जागेची व इमारतीची उणीव भासू लागली होती. यावेळी पुन्हा येथील दिवंगत आत्माराम गादेकर यांनी स्वमालकीची प्रशस्त जागा पोलीस दूरक्षेत्र बांधण्यासाठी दिली आहे. आज याच जागेतील पोलीस दूरक्षेत्राची इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीसह कर्मचारी निवासस्थानाची मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ या म्हणीप्रमाणे होऊन बसली आहे.
सध्या याठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक व दोन जवान कार्यरत आहेत. यातील उपनिरीक्षक हे मल्हारपेठ पोलीस ठाण्यातच जास्त वेळ असतात. राहिलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक सुटीवर गेला, तर एकाच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. यातच विभागातील नेत्यांकडून वारंवार हस्तक्षेप होऊन राजकीय दबाव टाकला जात असल्याने काम करतानाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. शासन व शासनकर्त्यांनी याठिकाणी कर्मचारी संख्या वाढवून इमारत बांधकामासाठी निधी देण्याची मागणी जोर धरत आहे.
चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्र इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. पोलीस खात्याच्या वरिष्ठांनी चाफळला कर्मचारी संख्या वाढवून द्यावी. -भरत साळुंखे, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, पाटण तालुका